देवगड फाटा (वार्ताहर) -

नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथे दत्तजयंती निमित्ताने मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत दत्त नामाचा जयघोष करत

पुष्पवृष्टी करत सायंकाळी 6 वाजता भास्करगिरी बाबांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

करोनाची महामारी लवकरात लवकर जाऊ द्या, सारे विश्व सुखी होऊ द्या अशी दत्त जन्मप्रसंगी प्रार्थना करुन भास्करगिरी महाराज यांनी भगवान दत्तात्रयांना साकडे घातले. करोनासंकट असल्याने श्री क्षेत्र देवगड मंदिर प्रांगणात भास्करगिरी बाबांच्या मार्गदर्शनाखाली मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत यंदाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. मंगळवारी सायंकाळी 6 वाजता श्री दत्त मंदिरात छोटेखानी पद्धतीने साजरा करण्यात आला. या दिवशी पहाटे भास्करगिरी बाबांच्या हस्ते वेदमंत्राच्या जयघोषात भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीची विधीवत पूजा करण्यात येऊन अभिषेक घालण्यात आला. भास्करगिरी बाबांच्या हस्ते पाळण्याची दोरी ओढण्यात येऊन आरती करण्यात आली.

भास्करगिरी महाराज म्हणाले की यावर्षी यात्रा रद्द करण्याचा निर्णय झाला. देवगडला न येता घरीच दत्त उपासना करावी या केलेल्या विनंतीचे पालन केल्याबद्दल त्यांनी भक्तांचे आभार मानले.भास्करगिरी महाराज म्हणाले, साठ वर्षांपूर्वी श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांनी हा महोत्सव सुरू केला. त्यांच्या कृपाआशीर्वादाने आज आपण स्वर्गसुखाचा आनंद उपभोगत आहे.करोनामुळे येथे सर्वांनी नियम पाळले. बाधा येऊ दिली नाही. गर्दीचा फायदा रोगाला नको म्हणून सुजाण माणसांनी गर्दी टाळली. असेच नियम सर्वांनी पाळले तर देशाचे वैभव वाढण्यास वेळ लागणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ‘व्हावे कल्याण सर्वांचे दुःखी कोणी असू नये’ अशी प्रार्थना त्यांनी केली.

तसेच यात्रा रद्द चा निर्णय याआधीच झाल्याने पहाटेपासून देवगडकडे येणारे रस्ते बंद करण्यात आले होते. त्यामुळे प्रवरासंगम, देवगडफाटा, नेवासा येथून देवगडकडे जाणारे रस्ते ओस पडलेले दिसत होते. नेवाशाचे प्रभारी पोलीस अधिकारी अभिनव त्यागी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

दरम्यान नामदार शंकरराव गडाख यांनी दत्तजयंतीच्या पुर्वसंध्येला श्रीक्षेत्र देवगड येथे जाऊन दर्शन घेतले व भास्करगिरी महाराजांसोबत चर्चा केली.दत्त जन्म सोहळयाच्या प्रसंगी सुनीलगिरी महाराज, योगी ऋषीनाथ महाराज, गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या मातोश्री सरूबाई पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलराव लंघे, माजी आमदार पांडुरंग अभंग, बाळासाहेब मुरकुटे, बदनापूरचे आमदार नारायण कुचे, प्रभारी अधिकारी अभिनव त्यागी, बजरंग विधाते, मुळा कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील, सरपंच अजय साबळे, दिनकरराव कदम, कल्याणी कवडे आदी उपस्थित होते.