नेवासा बुद्रुक मंडळातील शेतकरी पीक विम्याच्या 25 टक्के मदतीपासून वंचित

पाचेगाव-बेलपिंपळगाव परिसरातील शेतकर्‍यांचे तहसीलदारांना निवेदन
नेवासा बुद्रुक मंडळातील शेतकरी पीक विम्याच्या 25 टक्के मदतीपासून वंचित

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यातील आठ पैकी चार महसूल मंडळांना पीक विम्याची 25 टक्के मदत जाहीर करण्यात आली. पण तालुक्यातील इतर मंडळांच्या गावात अति पाऊस झाला का? नुसते नेवासा बुद्रुक मंडळात पावसाची नोंद घेण्यासाठी बसविण्यात आलेले पर्जन्यमापक हे नेवासा बुद्रुक येथे बसविण्यात आलेले आहे. पण काही प्रमाणात झालेला पाऊस हा फक्त पर्जन्यमापकावर पडला व इतर महसूल मंडळातील गावे कोरडेठाक आहे.

जवळपास तालुक्यातील सर्व महसूल मंडळातून 90 हजार 389 शेतकर्‍यांनी आपल्या पिकांचे संरक्षण होण्यासाठी या विमा संरक्षण योजनेत सहभाग घेतला आहे आणि पावसाचा 21 दिवसाचा खंड पडला तर पीक विम्यात सहभाग घेतलेल्या शेतकर्‍यांना पीक विमा कंपन्यांकडून तातडीची 25 टक्के मदत देण्याचे आदेश करण्यात आले.पण नेवासा बुद्रुकमध्ये गेल्या पंचवीस दिवसांचा खंड असून या महसूल मंडळातील शेतकर्‍यांना या मदतीपासून वंचित ठेवल्याचा आरोप या मंडळातील शेतकर्‍यांनी केला आहे.

शेतकर्‍यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, मौजे पाचेगाव, घोगरगाव, जैनपूर, बेलपिंपळगाव, पुनतगाव, लेकुरवाळी आखाडा, जायगुडे आखाडा इत्यादी नेवासा बुद्रुक व महसूल मंडळातील गावांना पावसाळा चालू झाल्यापासून तुरळक स्वरूपाचा पाऊस पडला. त्यावर शेतकर्‍यांनी पेरणी केली. परंतु गेल्या तीन महिन्यांपासून पावसाचे अत्यल्प प्रमाण असून खरीप हंगामातील प्रामुख्याने घेतलेली पिके सोयाबीन, कपाशी, बाजरी, तूर हे अक्षरशः पाण्यावाचून जळून खाक होत आहेत. अशी परिस्थिती नेवासा बुद्रुक महसूल मंडळात असताना देखील आमचे मंडळ या पीक विम्याच्या 25 टक्के नुकसान मदतीपासून वगळले गेले आहे.

तरी या महसूल मंडळातील शेतकर्‍यांना या तातडीने दिल्या जाणार्‍या पीक विमा मदतीत घेण्यात यावे,अशी आग्रही मागणी या महसुल मंडळातील शेतकर्‍यांनी नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे व कृषी विभागीय साहाय्यक अरुण उन्हाळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात शेतकरी संघटनेचे हरिभाऊ तुवर, डॉ. रोहित कुलकर्णी, बाळासाहेब शिंदे, दत्तात्रय पाटील, वामनराव तुवर, किशोर भागवत, नचिकेत कुलकर्णी, हरिभाऊ जगताप, जालिंदर विधाटे, गंगाधर मतकर, रमेश तुवर, काशिनाथ सुरोसे, वाल्मिक तुवर, दादा पवार, बाबासाहेब मतकर, भैय्या शेख यांच्यासह नेवासा बुद्रुक मंडळातील शेतकरी व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

नेवासा बुद्रुक मंडळातील शेतकर्‍यांना कायमस्वरूपी शासकीय मदतीपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप मंडळातील शेतकरी करीत आहेत.शासकीय योजनेत या महसूल मंडळातील शेतकर्‍यांना कायम संघर्ष करूनच मदत घ्यावी लागते. या महसूल मंडळातील गावांच्या कडेला असणार्‍या गावांना दरवेळी शासकीय मदत मिळते, पण या महसूल मंडळाला आंदोलन, रास्तारोको व निवेदन देऊनच मदत घ्यावी लागते असे का? पुढील काळात शासकीय मदत देताना सर्व शेतकर्‍यांना समान न्याय देण्यात यावा नाहीतर एकाला हात तर एकाला लाथ अशी दुटप्पी भूमिका घेऊ नये, अशी अपेक्षा या महसूल मंडळातील शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com