राहुरी कारागृहातून गज कापून पसार झालेला नेवाशाचा गुन्हेगार जेरबंद

राहुरी कारागृहातून गज कापून पसार झालेला नेवाशाचा गुन्हेगार जेरबंद

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरीच्या कारागृहातून खिडकीचे गज कापून पसार झालेल्या आरोपी नितीन उर्फ सोन्या माळीच्या नगरच्या स्थानिक गुन्हे शाखा व श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने माजलगाव (जि. बीड) येथे पुन्हा मुसक्या आवळल्या. त्याला काल पुन्हा राहुरीत गजाआड करण्यात आले. नितीन उर्फ सोन्या मच्छिंद्र माळी (वय 22, रा. मोरे चिंचोली, ता. नेवासा) हा मोका लावलेल्या कुख्यात सागर भांड टोळीचा मेंबर आहे. अद्याप या टोळीतील रवी लोंढे हा पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

राहुरी येथील तुरूंगात असताना दि.18 डिसेंबर रोजी पहाटे कारागृहाच्या खिडकीचे गज कापून महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोका) अंतर्गत कारवाई झालेला टोळी प्रमुख सागर भांड सह पाच आरोपी पसार झाले होते. त्याच दिवशी राहुरी पोलिसांनी सागर भांड ,किरण अजबे, जालिंदर सगळगिळे या पसार आरोपींना जेरबंद केले होते. मात्र नितीन उर्फ सोन्या माळी व रवी पोपट लोंढे हे दोघे पसार झाले होते.

काल (दि.27) नितीन माळी याला पोलिसांनी पुन्हा बेड्या ठोकल्या. या पलायन प्रकरणातील आरोपी रवी लोंढे अद्याप पसार आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत. राहुरीच्या ब्रिटिशकालीन कारागृहातून गज कापून कैदी पसार होण्याची ही दुसरी घटना असल्याने, नाशिकचे पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी कारागृहाची पाहणी केली होती. याप्रकरणी राहुरीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे ,पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव व घटनेच्या वेळी कारागृहाच्या सुरक्षेसाठी तैनात चार पोलीस कर्मचार्‍यांना या प्रकरणी दोषी धरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.