घोडेगावात बनावट नोटा! एकाच नंबरच्या अनेक नोटा

आठवडे बाजारात किरकोळ विक्रेते 'टारगेट'; हजारोंना 'चुना’
घोडेगावात बनावट नोटा! एकाच नंबरच्या अनेक नोटा

घोडेगाव (वार्ताहर)

राज्यात प्रसिद्ध असलेल्या नेवासा (Newasa) घोडेगाव (Ghodegoan) येथील तालुक्यातील घोडेगाव आठवडे बाजारात शुक्रवारी बनावट नोटा (Fake currency) आढळल्या. विशेष म्हणजे गर्दीचा फायदा घेत केवळ किरकोळ विक्रेत्यांनाच या रॅकेटने 'टार्गेट' केल्याने फसवणुकीचा आकडा काही हजारापर्यंतच राहीला.

राज्यातील लॉकडाऊन (Lockdown) हटल्यानंतर आठवडे बाजार आत्ता कुठे पूर्वपदावर येऊ लागले आहेत. त्यात घोडेगावसारख्या राज्यात प्रसिद्ध असलेल्या बाजारात बनावट नोटा आढळल्याने खळबळ उडाली आहे. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास भाजीपाला बाजारात हा प्रकार लक्षात आला. ठोक विक्रेते किरकोळ विक्रेत्यांकडे मालाची वसुली करण्यासाठी गेले असता, ६ एमके ८७२२८९ या एकाच नंबरची नोट अनेक व्यापाऱ्यांनी दिली.

ठोक विक्रेते प्रकाश येळवंडे यांच्याकडे एकाच क्रमांकाच्या दोन नोटा आल्यानंतर त्यांनी पुढील किरकोळ व्यापाऱ्यांकडून या नोटा नाकारल्या. परंतु अनेक व्यापाऱ्यांकडे या बनावट दोन- चार नोटा होत्या. बाजारातील गर्दी आणि किरकोळ व्यापाऱ्यांचा अशिक्षीतपणाचा फायदा या ठकाने घेतल्याचे दिसले. पोलिसांना मात्र याबाबत कसलीच माहिती नसल्याचे समजते.

दुपारी साडेतीनच्या सुमारास किरकोळ भाजी विक्रेत्यांकडे वसुलीसाठी गेलो होतो. त्यावेळी एकाच नंबरच्या अनेक नोटा आढळल्या. अंदाजे १० ते २० हजार रुपये रकमेची ही फसवणूक असण्याची शक्यता आहे.

प्रकाश येळवंडे, आडतदार.

अशा आहेत या नोटा...

अगदी खऱ्या नोटेसारखी ही नोट आहे. फक्त तिचा कागद थोडासा पातळ आहे. या नोटांवर एकच सिरीअल नंबर असल्याने त्या लक्षात आल्या. खऱ्या नोटांवरील गांधीजींची प्रतिमा विशिष्ट अँगलने दिसते, तर या बनावट नोटेवर ती सहज दिसते. गांधीजींच्या प्रतिमेखाली लिहलेला '१००' ही संख्या, चांदीची तार मात्र या बनावट नोटेत नाही.

मोठी फसवणूक टळली...

या रॅकेटकडे फक्त भाजीबाजारच टार्गेट केल्याचे दिसले. प्रसिद्ध जनावरांच्या बाजारात हे लोन पसरले असते तर, मोठी फसवणूक झाली असती. बाजारात फक्त १०० रुपयांच्याच बनावट नोटा आढळल्या. ५०० किंवा २००० च्याही बनावट नोटा असत्या, तर ही फसवणूक लाखोंच्या घरात गेली असती.

Related Stories

No stories found.