चांद्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ; लहान मुले, महिलांना मारहाण

चांद्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ; लहान मुले, महिलांना मारहाण

मोठा ऐवज लंपास

चांदा | वार्ताहर

नेवासा (Newasa) तालुक्यातील चांदा (Chanda) येथे काल रात्री दरोडेखोरांनी अक्षरशः धुमाकूळ घालत हरिभक्त परायण देविदास महाराज आडभाई तसेच किसन गायकवाड यांच्यावस्ती वरील लहान मुले महिलांसह आणि घरातील सर्वांना मारहाण करत दहशत निर्माण करून मोठा ऐवज लंपास केला.

काल शनिवार रात्री साडेबारा ते दीड वाजेपर्यंत चांदा गावात दरोडेखोरांचा धुमाकूळ चालू होता. चांदा येथील हभप रामायणाचार्य देविदास महाराज आडभाई यांच्या वस्तीवर दहा ते पंधरा दरोडेखोरांनी हल्ला केला. देविदास महाराज हे बाहेर पडवीत झोपलेले असताना त्यांचं उशीने तोंड दाबून त्यांना मारहाण करून घराचा दरवाजा उघडण्यास भाग पाडले. घरातील सामानाची उचकापाचक करून रोख रक्कम सोन्या-चांदीचे दागिने चोरली. महाराजांच्या आईच्या कानातील सोन्याचे दागिने अक्षरशः ओरबाडून घेतली. त्यामुळे आईच्या कानाला मोठी दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले आहे .

तसेच त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले. तेथील सर्वांना शस्त्राचा धाक दाखवत दहशत निर्माण करून घरातच डांबून टाकले. आडभाई महाराजांचे हात बांधलेले स्थितीत त्यांना घरात कोडून ठेवण्यात आले. त्यांच्याजवळील मोबाईल हिसकावुन घेतला. बाहेरून कडी लावून तिथून दरोडेखोरांनी पोबारा करत दरोडेखोर गायकवाड यांच्या वस्तीवर आले. तेथे रहात असलेल्या किसन एकनाथ गायकवाड व नारायण एकनाथ गायकवाड यांच्या घरी दरोडा टाकला. त्यामध्ये किसन एकनाथ गायकवाड यांना जबर मारहाण करत दहशत निर्माण केली. तुमच्याजवळ असेल ते लवकर काढून द्या. असे म्हणत त्यांना मारहाण केली. त्यांचा मुलगा ऋषिकेश गायकवाड हे घरातून बाहेर आले असता त्यांनाही मारहाण करत जवळ असेल ते काढून द्या असे सांगितले.

ऋषिकेश यांनी प्रसंगावधान राखत मारहाण करू नका तुम्हाला सर्व देतो अशी विनवणी दरोडेखोरांना केली. मात्र ऋषीकेश यांचा तीन वर्षे वयाच्या मुलाच्या गळ्याला चाकू लावत घरातील सर्व सोने नाणी काढून द्या असे धमकावले. प्रचंड दहशत निर्माण करत ऋषिकेश गायकवाड यांचे हात बांधून सर्व कुटुंबातील सदस्यांना एका खोलीत डांबून टाकले व तेथून पोबारा केला. मात्र ऋषिकेश यांचा भावाने प्रसंगावधान राखत आपल्या मोबाईल वरुन शेजाऱ्यांना याची कल्पना दिली. शेजारील वस्तीवरील लोक जागे झाले. गाडीचा आवाज आल्याने चोरट्यांनी तेथून काढता पाय घेतला.

आजूबाजूच्या लोकांना याची कल्पना आल्यानंतर त्यांनी हभप देविदास महाराज यांनाही फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा फोन बंद येत असल्याने किरण दहातोंडे हे स्वतः त्यांच्या घरी गेले तेथे गेल्यानंतर त्यानी आवाज दिला असता महाराजांनी आतूनच आम्ही आत मध्ये बंद असून बाहेरून कडी लावली असल्याचे सांगितले. किरण दहातोंडे यांनी बाहेरून कडी उघडत या सर्वांची सुटका केली.

त्यानंतर सदर घटनेची माहिती सोनई पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी प्रसंगावधान राखत तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत दरोडेखोर तिथून निसटून जाण्यात यशस्वी झाले होते. पहाटेच श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करून काही सुगावा मिळतो काय याचा प्रयत्न पोलिसांनी केला. श्वान पथकाने दूरपर्यंत मार्ग काढला असल्याचे प्राथमिक माहिती मिळाली असून शेवगाव उपविभागीय अधिकारी मुंडे यांच्यासह सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात हे घटनास्थळी थांबून होते. सदर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्याचे काम सध्या चालू असून पोलिसांनी दरोडेखोरांच्या शोधासाठी वेगवेगळी पथके तयार केली असल्याची माहिती मिळाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com