तपासणी किट व ऑक्सिजनसह विविध सुविधांची कमतरता

नेवाशातील बैठकीत पालकमंत्र्यांसमोर माजी आमदार अभंग यांनी मांडल्या व्यथा
तपासणी किट व ऑक्सिजनसह विविध सुविधांची कमतरता

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा तालुक्यामध्ये तपासणी किट नसल्याने व ऑक्सिजनसह आरोग्य सुविधांची कमतरता असल्याने लोक तडफडून घरी मरत आहेत अशा शब्दात माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी संपर्क मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या तर खासदार सदाशिव लोखंडे यांनी आम्ही घेतलेल्या बैठकांमधील कोणत्याही गोष्टीची पूर्तता झालेली नसल्याने बैठकीला काहीच अर्थ राहिलेला नाही अशी खंत व्यक्त केली.नेवासा येथे काल पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पंचायत समिती सभागृहात करोना आढावा बैठक पार पडली.

वंचित आघाडीचे संजय सुखदान यांच्या काळे झेंडे दाखवण्याच्या इशार्‍यामुळे आधीच वादग्रस्त ठरलेली ही बैठक अर्धा तासात संपली. सुखदान, भाजपचे मनोज पारखे निरंजन डहाळे यांनी निषेध करण्याचा हक्क डावलल्यामुळे पोलीस ठाण्यात घोषणाबाजी केली.

बैठकीला जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी अजित थोरबोले, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, पंचायत समिती सभापती रावसाहेब कांगणे उपविभागीय अधिकारी गणेश पाटील यांच्यासह श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी अभिराज सूर्यवंशी, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा उपस्थित होते.

आरोग्य अधिकारी व तहसीलदार यांनी ताललक्याचा करोना अहवाल सादर केला. यानंतर आरोग्यविषयक कमतरता सांगताना माजी आमदार पांडुरंग यांनी कुकाणा व चांदा प्राथमिक आरोग्य केंद्राविषयीच्या तक्रारी करताना तालुक्यात व या परिसरामध्ये करोनाच्या टेस्टच होत नसल्याने प्रादुर्भाव वाढत आहे व रुग्ण घरातच तडफडून मरत असल्याचे सांगितले. चांदा येथील पंचायत समितीच्या माजी सभापतींनादेखील ऑक्सिजन बेड उपलब्ध झाले नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. दरम्यान खासदार सदाशिव लोखंडे यांनी मागील आठवड्यात घेतलेल्या आढावा बैठकीत दिलेल्या सूचनांचे पालन झाले नाही व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ऑक्सिजन बेड उपलब्ध नाहीत आणि दोन रुग्णवाहिकांचे आश्वासन पाळले गेले नसल्याचे सांगतानाआपण घेतलेल्या बैठकीला काही अर्थच राहिला नसल्याची खंत व्यक्त केली.

आढाव्यानंतर बोलताना संपर्कमंत्री हणाले की शिंगणापूर येथे जिल्हा नियोजन निधीतून ऑक्सीजन प्लान्ट उभा राहील तसेच जिल्ह्याला रेमडेसीव्हर जास्त मिळण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com