नेवासा तालुक्यातील 1121 करोना बाधित घेत आहेत उपचार

एकूण बाधितांची संख्या 10 हजार 888; नऊ हजार 530 संक्रमित झाले करोनामुक्त
नेवासा तालुक्यातील 1121 करोना बाधित घेत आहेत उपचार

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यात पहिली व दुसरी लाट मिळून आतापर्यंत एकूण 10 हजार 888 करोना संक्रमित आढळून आले असून त्यापैकी 9 हजार 530 बाधित पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत तर 1121 संक्रमित तालुक्यातील तसेच तालुक्याबाहेरील विविध करोना उपचार केंद्रांमध्ये उपचार घेत आहेत.

तालुक्यात एक नगरपंचायत आहे तर एकूण 126 गावांसाठी 114 ग्रामपंचायती आहेत. 126 पैकी चिंचबन, बोरगाव व म्हाळापूर या तीन गावांनी करोनाला गावाबाहेर ठेवण्यात यश मिळवले आहे. त्यातील चिंचबन ही स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. तर बोरगाव हे सुरेगावगंगा व बोरगाव या ग्रुप ग्रामपंचायतीतील एक गाव आहे. तर तिसरे गाव म्हाळापूर हे प्रवरासंगम, म्हाळापूर, माळेवाडी या ग्रुप ग्रामपंचायतीतील एक गाव आहे.

करोनाला गावापासून दूर ठेवलेली ही तीनही गावे कमी लोकसंख्येची आहेत. मात्र तरीही या गावांनी करोनाला प्रवेश दिला नाही ही बाब विशेषच म्हणावी लागेल.

तालुक्यात सध्या उपचार घेत असलेल्या 1121 करोना संक्रमितांपैकी सर्वाधिक संक्रमित सोनई, नेवासा खुर्द (नेवासा शहर), मुकिंदपूर (नेवासाफाटा) व घोडेगाव येथील आहेत.

1121 पैकी जवळपास दोनशे रुग्ण हे सोनईतील आहेत. दीडशेच्या जवळपास नेवासा शहरातील तर शंभर ते सव्वाशेच्या दरम्यान मुकिंदपूर व घोडेगाव येथील रुग्णांची संख्या आहे.

नेवासा तालुक्यात सध्या दोन शासकीय तर तीन खासगी कोविड केअर सेंटर सुरु आहेत. या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना दाखल करुन त्यांच्यावर औषधोपचार केले जात आहेत.

तालुक्यात एकूण 13 डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (ऑक्सिजन सुविधा) आहेत. या मध्ये दोन शासकीय तर 11 खासगी हेल्थ सेंटर आहेत. नेवासाफाटा येथील ग्रामीण रुग्णालय व शिंगणापूर येथील शनैश्वर ग्रामीण रुग्णालय ही ती दोन केंद्रे आहेत. येथे गंभीर रुग्णांसाठी ऑक्सीजनची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. याशिवाय तालुक्यातील विविध 11 खासगी रुग्णालयांमध्येही कोविडवर ऑक्सीजन सुविधेसह उपचार केले जात आहेत.

तालुक्यातील चार प्रमुख गावांमध्ये करोनाबाधितांची संख्या व उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांची संख्या अधिक असली तरी तालुक्यातील काही छोट्या गावांमध्येही काही काळ मोठ्या संख्येने (लोकसंख्येच्या तुलनेत) रुग्ण आढळून आले. तालुक्यातील मंगळापूर, तामसवाडी, बेलपांढरी, पुनतगाव ही त्यापैकी काही गावे आहेत.

करोनाने मोठ्या गावांबरोबरच छोट्या गावांमध्येही आपले अस्तित्व दाखवून दिले. 19 मे या दिवशी तालुक्यात करोना बाधितांचा उच्चांक नोंदला गेला. या दिवशी तालुक्यात करोना रुग्णांची संख्या चार शतकांवर गेली होती.

शनिवारी तीन आठवड्यांनंतर करोना बाधितांची संख्या शंभराच्या खाली (76) गेली. रविवारी मात्र 106 बाधित आढळले.

जवळपास दोन महिन्यांपासून सुरु असलेले शासकीय लॉकडाऊन तसेच विविध गावांनी केलेल्या जनता कर्फ्यूचेही चांगले परिणाम दिसू लागले आहेत.

काहींचे घरुनच उपचार

नेवासा तालुक्यातील करोनाची लक्षणे असलेल्या काही रुग्णांनी खासगी ठिकाणी गुपचूप करोनाची तपासणी केली. पॉजिटीव्ह आल्यावर त्याची नोंद शासकीय रेकॉर्डला करू नका अशी अट खासगी तापसणी केंद्र चालकांना घातली. त्यानंतर घरी राहूनच अनेकांनी खासगी डॉक्टरांकडून वैद्यकीय उपचार घेतले असल्याची तालुक्यात चर्चा आहे.

उपचार घेत असलेल्यांमध्ये चार गावांतील सर्वाधिक रुग्ण

नेवासा तालुक्यातील 1121 रुग्ण विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण सोनई, नेवासा शहर (नेवासा खुर्द), घोडेगाव व नेवासाफाटा (मुकिंदपूर) येथील असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी अभिराज सुर्यवंशी यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com