आठ दिवसात आरोपींना अटक न झाल्यास पुन्हा आंदोलन

सर्वपक्षीय चांदा बंदला शंभर टक्के प्रतिसाद
आठ दिवसात आरोपींना अटक न झाल्यास पुन्हा आंदोलन

चांदा | वार्ताहर | Chanda

नेवासा (Newasa) तालुक्यातील चांदा (Chanda) येथील ज्ञानदेव सोपान दहातोंडे हत्याप्रकरणातील (Dnyandev Sopan Dahatonde murder case) आरोपींना आठ दिवसात अटक न झाल्यास १२ जुलै रोजी पुन्हा आंदोलन करण्यात येईल. या सदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटिल (Home Minister Dilip Walse Patil) यांना भेटून माहिती देण्याचा निर्धार चांदा येथील सर्वपक्षीय पदाधिऱ्यांनी केला. दरम्यान आज पुकारलेल्या बंदला सर्व ग्रामस्थ व्यापाऱ्यांनी साथ देत शंभर टक्के यशस्वी केला.

आठ दिवसात आरोपींना अटक न झाल्यास पुन्हा आंदोलन
भयंकर! लहान मुलाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून

चांदा येथील ज्ञानदेव सोपान दहातोंडे वय४२ यांची भरचौकात हत्या होऊन महिना झाला तरी अदयाप फरार आरोपीना अटक झाली नाही तसेच गावात अवैध धंदे, गावठी कट्टे आदिचे प्रमाण वाढले असून दहशत आणि दादागिरी वाढली आहे. पोलिसाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ गावातील सर्व पक्षांचे राजकीय पदाधिकारी व ग्रामस्थानी गेल्या आठवडयात गृहमंत्री दिलीप वळसे पाटिल तसेच नगरचे पोलिस अधिक्षक मनोज पाटिल यांना आंदोलनाचे निवेदन दिले होते . त्यानुसार आज मंगळवार दिनांक सहा जुलै रोजी चांदा गावबंद व निषेध सभा आंदोलन झाले. आज सकाळी गावातील व्यापाऱ्यांनी आपआपली दुकाने बंद ठेवली होती. सकाळी नऊ वाजता चांदा बाजार तळावर सर्वपक्षीय नेतेमंडळी सर्व ग्रामस्थ एकत्र आले छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन निषेध सभेला सुरुवात झाली. यावेळी ज्ञानदेव सोपान दहातोंडे यांची हत्या होऊन एक महिना उलटला हत्या करणारे आरोपी अजुनही पोलिसांना सापडत नसल्याबद्दल सर्वच वक्त्यांनी नाराजी व्यक्त केली.

गावात गुंडगिरी दादागिरी चालु आहे, अवैध धंदे खुलेआम सुरु आहेत. भरचौकात चौकात हे धंदे सुरू असून त्या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या महिलांना या टारगटांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गावात गावठी कट्टयासारखे हत्यारे असूनही पोलिस प्रशासन याबद्दल कोणतीच कारवाई करत नाही. बाहेरून आरोपी गावात येऊन भरचौकात हत्या होते ही निंदनीय गोष्ट आहे. आरोपी निश्चित होऊनही ते पोलिसांना सापडत नाही. याची सर्वच वक्त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. यावेळी मराठा शेतकरी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजीराव दहातोंडे, पंचायत समितीचे माजी सभापती कारभारी जावळे, जिल्हा परीषद सदस्य अनिलराव अडसुरे, राष्ट्रवादी सेलचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब जावळे, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष कैलास दहातोंडे, अॅड योगेश दहातोंडे, अमित रासने, आरपीआयचे बाबासाहेब आल्हाट आदिनी आपल्या भाषणातुन नाराजी व्यक्त केली. १२ जुलैपर्यंत सदर प्रकरणाचा तपास लागला नाही तर नगर औरंगाबाद महामार्गावर घोडेगाव चौफुला येथे रस्तारोको आंदोलन करण्याचा निर्धारही या वेळी सर्वपक्षीय नेत्यांनी केला .

पोलिस प्रशासनाच्या वतीने सोनईचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी निवेदन स्विकारले. त्यावेळी ते म्हणाले पोलिसांचा तपास योग्य दिशेने चालु आहे. पोलिसांची पथके आरोपींच्या शोधार्थ रवाना झाली आहेत. त्यातील आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. मात्र आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल. आरोपी संदर्भात ग्रामस्थांना काही माहिती मिळाल्यास त्यांनी निसंकोचपणे सांगावी त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. त्यामुळे आपण गावबंदचा निर्णय मागे घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. त्याच्या आवाहनाला सर्वपक्षीय नेत्यांनी सहमती देत सभा संपल्यानंतर गावातील व्यवहार सुरळीत सुरू झाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com