नेवाशाची केळी आखाती देशांच्या बाजारपेठेत

कृषी पदवीधरांच्या फार्मर्स कंपनीचा पुढाकार; शेतकर्‍यांना मिळाली हक्काची बाजारपेठ व शाश्‍वत दर
नेवाशाची केळी आखाती देशांच्या बाजारपेठेत

सुखदेव फुलारी

नेवासा - नेवासा तालुका अ‍ॅग्रीकॉस फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या पुढाकाराने तालुक्यातील शेतकर्‍यांची 200 मेट्रिक टन केळी इराण, इराक, सौदीअरेबिया, कुवेत या आखाती देशांतील बाजारपेठेत निर्यात झाली आहे.

शेती माल कसा पिकवायचा हे सांगण्यापेक्षा तो कसा विकायचा ते सांगा असा सवाल करणारे शेतकरी अधिक आहेत. पण नेवासा तालुक्यातील ग्रामीण भागातील दहा कृषी पदवीधरांनी एकत्र येत स्थापन केलेली फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आता कसं पिकवायचं हे तर सांगतेच शिवाय कोठे अन् कसं विकावं याचं ज्ञान शेतकर्‍यांना देत असल्याने केळी उत्पादकांना हक्काच्या बाजारपेठेसह शाश्‍वत ग्राहक व दरही मिळू लागला आहे. तालुक्यासह लगतच्या तालुक्यातील केळी उत्पादकांचा माल मुंबई मार्गे थेट इराण, इराक, सौदीअरेबिया, कुवेतच्या बाजारपेठांत विक्रीची संधी मिळाली आहे.

नेवासा तालुका अग्रीकॉस फार्मर्स प्रोड्युसर कंपनी या नावाने ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे. केळीच्या लागवडीपासून ते काढणी विक्रीपर्यंत ही कंपनी शेतकर्‍यांना साथ देते आहे.सुरूवातीला ही कंपनी केळी प्लॉटचे सिलेक्शन करते. त्यानंतर लागवड व्यवस्थापनाची थेट शेतात जाऊन माहिती दिली जाते. त्यात प्रथम उतीसंवर्धीत रोपे, सेंद्रीय, रासायनिक खतांचा किती व कसा वापर, झाडांची योग्य वाढ याकडे कंपनीचे सदस्य स्वत: लक्ष घालतात. घड बाहेर आला की त्या घडाची निगा कंपनी स्वखर्चातून करते.कमळ काढणे, आंतरप्रवाही औषधांचा वापर, घडांचे रस शोषण करत असलेल्या किडीपासून संरक्षण करण्यासाठी इंजेक्शन देणे, बुरशीनाशक स्प्रे ही कामे कंपनीमार्फतच केली जातात व घडांची संख्या मर्यादित 7 ते 10 फण्यांचीच ठेवण्यात येते. त्यासाठी प्रत्येक घडाला टॅगिंग केले जात असल्याने ती फळे नेमके केव्हा विक्रीयोग्य होतील याचा अंदाज येतो.

केळी पिकांना डोसेस, खते या मार्गदर्शनासह हॉर्वेस्टिंग माल बाजारभावापेक्षाही 4 ते 5 रूपये अधिक दराने कंपनी खरेदी करते. कंपनी त्यासाठी प्रतिएकर फळांची निगाही ठेवण्याचे काम करते. कुकाणा येथे कंपनीचे पॅकींग हाऊस असून त्यात फळांची प्रतवारी, केमिकल ट्रिटमेंट पॅकींग केले जाते.एखाद्या शेतकयाकडे 10 टन माल असेल तर प्रत्यक्ष शेतात जाऊन हॉर्वेस्टिंग केले जाते. कुकाण्यातील पॅकींग हाऊसमधुन केळी घड मुंबईला कंटेनरने पाठवले जातात. तेथून जहाजाने ते अरब देशांत जातात. त्यासाठी केळी क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या देसाई फ्रुट या गुजरातेतील कंपनीशी नेवासा कंपनीने करार केलेला आहे. त्यामुळे शाश्‍वत ग्राहकही उपलब्ध आहेत.

एकनाथ भगत, सुदाम बनसोडे, ज्ञानेश्‍वर डावखर, कल्याण शेजूळ, दिपक भागवत, विशाल पिंपळे, प्रवीण कुर्‍हे, योगेश शेजूळ व प्रा. सुनिल बोरूडे यांनी एकत्र येत ही कंपनी स्थापन केली आहे तर श्रीनिकेत भगत हा कंपनीचा कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहे. विशेष म्हणजे कंपनीने तयार केलेले हे सर्व जण वेगवेळ्या नोकरीत कार्यरत आहेत. कृषी दुकानदार, ग्रामविकास अधिकारी, प्राध्यापक आहेत पण मुळ बीएससी अग्री शिक्षण घेतलेलेच.

दर्जेदार शेतमाल पिकवण्यासाठी ही कंपनी प्रथम शेतकर्‍यांना प्रोत्साहित करते.त्यानंतर बाजारभावही चांगला मिळावा यासाठी शेतकर्‍यांचा माल खरेदी करून त्यास चांगला बाजारभाव मिळवून देत सांगड घालते. शेती निसर्गावर अवलंबून. त्यातच बाजाराची अनिश्‍चितता. यामुळे केळी उत्पादकांना या कंपनीने आशेचा किरण दाखवला आहे.

कंपनीच्या कुकाणा येथील पकिंगहाऊस मध्ये फळांची प्रतवारी करुन बाजारपेठेत माल पाठवला जातो.

उत्पादकांना मिळतो अधिक दर

250 केळी उत्पादक नेवासा कंपनीचे सभासद असून प्रतिएकरी कंपनी 15 ते 20 हजार रूपये केळी उत्पादकांना मार्गदर्शन व विक्री व्यवस्थानासाठी खर्च करते. बाजारपेठेअभावी शेतकरी केळीकडे पाठ फिरवताना दिसताच आम्ही केळी उत्पादकांना ग्राहक व अधिक दर मिळवून देत आहोत. लॉकडाऊनमुळे सध्या केळीला 4 ते 5 रुपयांचा दर असला तरी आम्ही तो 10 ते 11 रुपयांपर्यंत देत आहोत.

-बाळासाहेब कोरडे

अध्यक्ष, नेवासा तालुका अ‍ॅग्रीकॉस फार्मर्स प्रोड्युसर कंपनी

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com