नेवासा-बाभळेश्वर महामार्गासाठी आमदार, खासदारांच्या घरासमोर आंदोलन - लोंढे

नेवासा-बाभळेश्वर महामार्गासाठी आमदार, खासदारांच्या घरासमोर आंदोलन - लोंढे

टिळकनगर |वार्ताहर| Tilaknagar

नगर-मनमाड व औरंगाबाद -अहमदनगर या महामार्गाला जोडणार्‍या नेवासा ते बाभळेश्वर या 45 क्रमांकाच्या महामार्गासाठी आता आमदार, खासदार यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अशोक लोंढे यांनी दिली.

या रस्त्यासाठी अनेक आंदोलने, उपोषणे झाल्यानंतर लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी वर्क ऑर्डर झाली. लवकरच कामाला सुरुवात होणार आहे, असे नेहमीच्या पद्धतीने उत्तर ऐकून पाठांतर झाले आहे. पण प्रत्यक्षात कामाला सुरुवात कधी होणार असा प्रश्न आहे. आ. लहु कानडे यांना प्रशासकीय कामाचा मोठा अनुभव आहे. एवढी आंदोलन होऊनही त्यांनी कधीच विचारपुस करण्याची तसदी घेतली नाही. आता घरासमोर आंदोलन केल्यानंतर ते बोलतात का हेच पहायचे आहे. तसेच कमी कालावधीत सलग दुसर्‍यांदा खासदार झालेल्या सदाशिव लोखंडे यांच्या श्रीरामपूर निवासस्थानी दुसर्‍या दिवशी आंदोलन करून या महामार्गासाठी आजपर्यंत काय प्रयत्न केले याची विचारणा करण्यात येणार आहे.

काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी मिळून महाआघाडी सरकार असताना रस्त्यावर गोट्या खेळून, मुंडन करून, खंड्यात झाडे लावून, हार घालून आंदोलने केली. त्यानंतरही जाग येत नसेल तर लोकशाही मार्गाने लोकप्रतिनिधीच्या घरासमोर बसून जोपर्यंत उत्तर भेटत नाही तोपर्यंत आत्मक्लेश जवाब दो आंदोलन करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे लोंढे यांनी सांगितले.

या आंदोलनात यापूर्वी आम आदमी, प्रहार जनशक्ती, भीमशक्ती, रिपब्लिकन पक्ष, छावा संघटना आदींनी सहभाग घेतला होता. भविष्यात सर्वपक्षीय जनआंदोलन करण्यात येईल. यासाठी लोंढे, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, भीमशक्तीचे संदीप मगर, प्रहार जनशक्ती पक्षाचे सागर दुपाटी, रिपब्लिकन पक्षाचे संजय बोरगे, छावा संघटनेचे विश्वनाथ वाघ यांच्यासह सामाजिक संघटना, विविध राजकीय संघटना यांनी या महामार्गाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी कंबर कसली आहे.

Related Stories

No stories found.