नेवाशात एटीएममधून निघाल्या बनावट नोटा

File Photo
File Photo

नेवासा बुद्रुक |वार्ताहर| Newasa

नेवासा शहरातील एटीएममधूनच बनावट नोटा आल्यामुळे ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे. एटीएममधून निघणार्‍या नोटा कोर्‍या आणि तंतोतंत निघतात, असा प्रत्येकाचा विश्वास असून प्रवासात सुरक्षिततेचा उपाय म्हणून एटीएमद्वारे पैसे काढणार्‍यांची संख्या मोठी आहे. परंतु नेवाशातील या प्रकरणामुळे या विश्वासाला धक्का पोहचला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, आषाढी एकादशीमुळे आज नेवासे शहरात गर्दी होती. गुरुवारी (दि. 29) रोजी सकाळी तिळापूर (ता. राहुरी) येथील अभय सुदाम मुंढे हा तरुण आपल्या घरच्यांसोबत कामानिमित्त नेवासा येथे आला होता. बस स्टॅन्ड परिसरातील एका एटीएममधून त्याने काढलेल्या नोटांमध्ये चक्क पाचशे रुपयांच्या दोन नोटा नकली निघाल्या.

अभय मुंढे हा गाडीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी पेट्रोल पंपावर गेला असता पेट्रोलपंप चालकाने सदरच्या नोटा बनावट असल्याचे सांगितले. त्याने तत्काळ तेथील तक्रार निवारण नंबरवर संपर्क केला तसेच तेथे असलेल्या नागरिकांना ही बाब सांगितली. अनेकांचा विश्वास बसत नसल्याने एटीएममध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चौकशी करण्याचा आग्रह केला. तक्रार निवारण नंबरवर फोन केला असता मुंढे यांना कोणत्याही बँकेत जाऊन नोटा बदलून घ्या, असे सांगण्यात आले.

आषाढी एकादशी व बकरी ईद असल्याने सर्व बँका बंद होत्या. तसेच ज्या बँकेचे एटीएम आहे, त्या बँकेची शाखा नेवासा शहरात नाही. त्यामुळे मुंढे यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले.

श्री. मुंढे यांनी एटीएममधून 3 हजार रुपये इतकी रक्कम काढली. त्यात पाचशे रुपयाच्या दोन नोटा नकली आढळल्या. हे लक्षात येताच त्यांनी बँकेकडे संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता एकादशीनिमित्त सुट्टी असल्याने संपर्क होऊ शकला नाही. बँक किंवा एटीएममधून अशा नकली नोटा ग्राहकांपर्यंत पोहचू लागल्या तर यापुढे जबाबदारी कुणाची? असा सवाल परिसरातील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com