नेवासा तालुक्यात 123 जनावरे दगावली

7343 जनावरांचे लाळ्याखुरकुत व घटसर्प लसीकरण पूर्ण
नेवासा तालुक्यात 123 जनावरे दगावली

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

लाळ्याखुरकुत-घटसर्प रोगाची लागण होऊन आजपर्यंत तालुक्यातील 123 जनावरे दगावली असून कुकाणा व माका पशुवैद्यकीय दवाखान्याचे कार्यक्षेत्रातील गावांमध्ये 7343 जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

तालुक्यातील भेंडा बुद्रुक, खुर्द व जेऊर हैबती गावाचे परिसरातील जनावरांना लाळ्या खुरकुतासह घटसर्प रोगाची लागण होऊन गाई दगावल्याची घटना घडल्याने पशुधन पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा परिषद पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी पुढाकार घेत पुण्याहून तातडीने लसीचे 8 हजार डोस मागवून जनावरांचे लसीकरण सुरू केले होते. तातडीने लसीकरण केल्यामुळे जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली.

कुकाणा पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गत येणार्‍या भेंडा बुद्रुक, भेंडा खुर्द, जेऊर हैबती, तरवडी, नांदूरशिकारी, कुकाणा व देवगाव गावातील एकूण 6343 जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असून एकूण 108 जनावरे दगावली असल्याची माहिती कुकाण्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ.अमोल गायकवाड यांनी दिली.

तर माका पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गत येणार्‍या तेलकुडगाव, देडगाव, माका या गावातील एकूण 1000 जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असून एकूण 15 जनावरे दगावली असल्याची माहिती माक्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ.हंसराज पाटेकर यांनी दिली. दरम्यान भेंडा बुद्रुक येथील शेतकरी ज्ञानदेव विठोबा तागड यांची दोन महिन्याची पहिली वेताची गाय सोमवार दि.3 एप्रिल रोजी लाळ्या खुरकूत-घटसर्प रोगाने दगावली आहे. त्यांचे सुमारे 35 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

तालुक्यात कुकाणा-माका पशुवैद्यकीय दवाखाना कार्यक्षेत्रातील गावांमधील जनावरांमध्येच या रोगाची जास्त लागण झाल्याचे दिसून आले. 24 एप्रिलपासून लसीकरण सुरू केले. आजअखेर 7343 जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असून लसीकरणामुळे जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण घटले. लवकरात लवकर उर्वरित लसीकरण होईल.

- डॉ. दिनेश पंडुरे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी

आजपर्यंत 123 जनावरे दगावली आहेत. यात प्रामुख्याने संकरित गायी, कालवडी व वासरांचा समावेश आहे. भेंडा बुद्रुक (10), भेंडा खुर्द (23), कुकाणा (5), जेऊर हैबती (52), देवगाव (5), नांदूर शिकारी (6), तरवडी (7), तेलकुडगाव (8), देडगाव (7)

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com