तोफखाना पोलीस मापारीच्या मागावर

जात पडताळणी समितीची फसवणुक; नेवासा तालुक्यात चर्चेला उधाण
तोफखाना पोलीस मापारीच्या मागावर

अहमदनगर | प्रतिनिधी

अनधिकृतपणे उतारा जोडुन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची फसवणुक करणार्‍या नेवासा येथील स्वप्नील राजेंद्र मापारी याच्या शोधात तोफखाना पोलीस असून त्याला लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

स्वप्नील राजेंद्र मापारी याने 16 फेब्रुवारी 2022 रोजी त्याचा भाऊ अनिकेत राजेंद्र मापारी यांच्या वाणी जातीच्या जात प्रमाणपत्र पडताळणी शैक्षणिक प्रकरणात जोडलेला गणपती महादू (आडनाव नमूद नाही) यांना मुलगी झाल्याचा सन 1920 चा गाव नमुना नं. 14 चा उतारा अर्जदार अदित्य बालाजी भवर (रा. खामगाव ता. नेवासा) याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्तावाला अनधिकृतपणे जोडुन तसा प्रस्ताव जिल्हा जात पडताळणी समितीकडे सादर केला होता.

या प्रकरणी स्वप्नील मापारी विरोधात गुरूवारी (दिनांक 25 मे) तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक सईदखाँ दादाखाँ पठाण (वय 53, रा. सूर्यानगर, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. निरीक्षक पठाण यांनी यासंदर्भात चौकशी केली असता चौकशी दरम्यान असे समोर आले की, अदित्य बालाजी भवर याचा वाणी जातीदावा प्रस्ताव नातेवाईक स्वप्नील राजेंद्र मापारी याने तयार केला असून तो समितीकडे सादर केला आहे.

यामध्ये त्याने अनधिकृत उतारा जोडला आहे. सदरचा उतारा जोडून अदित्य बालाजी भवर यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्याचा प्रयत्न करून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, मापारीविरोधात गुन्हा दाखल झाल्याने नेवासा शहरासह तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. त्याचा शोध तोफखाना पोलिसांकडून घेतला जात आहे. लवकरच त्याला अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार रणजित बारगजे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com