अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
नेवासा | तालुका प्रतिनिधी
नगर-औरंगाबाद महामार्गावरिल दहेगांव-बिडकिन मार्गावर मुरमी शिवारात अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत नेवासा तालुक्यातील तामसवाडीतील एका महिलेचा मृत्यू झाला असून अन्य दोघे जखमी झाले आहेत. ही घटना शनिवार दि.२६ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली.
यबाबद अधिक माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील तामसवाडी येथील अमोल राजेंद्र खोपडे (वय ४५ वर्षे) व शोभा रवींद्र खोपडे (वय ३५ वर्षे) यांच्यासोबत मोटारसायकलवर भीमाबाई हिरामन खोपडे (वय ६५ वर्षे) रा. तामसवाडी ता. नेवासा, जि. अहमदनगर हे बिडकिन येथे राहणाऱ्या नातीच्या लग्नाला जात होत्या.
गंगापूर तालुक्यातील दहेगांव-बिडकिन या राज्य महामार्गावर दि. २६ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास इसारवाडी फाट्याकडून बिडकिनच्या दिशेने निघालेल्या त्यांच्या दुचाकीला मुरमी शिवारात अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात भीमाबाई हिरामन खोपडे या गंभीर तर अन्य दोघेही जखमी झाले. त्यांना उपचारार्थ उपस्थितांनी गंगापूर येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.
मात्र उपचार सुरू असताना भीमाबाई हिरामन खोपडे (वय ६५ वर्षे) यांचा मृत्यू झाला. अमोल राजेंद्र खोपडे व शोभा रवींद्र खोपडे यांच्यावर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची वाळूज पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार शेख सलीम करीत आहेत.
दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते पिनुशेठ जगताप,अप्पासाहेब आयनर यांचेसह तामसवाडी ग्रामस्थानी अपघातस्थळी धाव घेऊन मदत केली.उत्तरीय तपासणी नतंर मयत भीमाबाई यांचा मृतदेह उशिरा तामसवाडी येथे आणून अंत्यसंस्कार करण्यात आला.