भरधाव जाणाऱ्या डंपरने शाळकरी मुलाला उडवले; मुलगा गंभीर जखमी

भरधाव जाणाऱ्या डंपरने शाळकरी मुलाला उडवले; मुलगा गंभीर जखमी

चांदा | वार्ताहर

नेवासा तालुक्यातील जवाहर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्याला भरधाव जाणाऱ्या डंपरने धडक दिली असून मुलगा गंभीर जखमी झाला. तर डंपर चालक तेथे न थांबता वाहन घेऊन तेथून पसार झाल्याने चांदा ग्रामस्थांमध्ये प्रचंड चिड व्यक्त होत आहे. दरम्यान जखमी विद्यार्थ्याला नगर येथील दवाखान्यात हलवण्यात आले असून तेथे त्यावर उपचार सुरू आहेत

आज (शनिवार) आठवडे बाजार असल्याने सकाळपासूनच चांदा कुकाणा रस्त्यावर वर्दळ सुरू होती. त्यातच जवाहर विद्यालयाची चाचणी परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थी सकाळीच शाळेला येत असताना इयत्ता पाचवीचा विद्यार्थी सोमनाथ कानिफ दहातोंडे हा आपल्या सायकलवरून शाळेत येत असताना शाळेजवळीलच नदीजवळ घोडेगाव मार्गे येणाऱ्या मालवाहू ढंपरणे त्यास धडक दिल्याने तो गंभीर जखमी होऊन बाजूला फेकला गेला.

सात सव्वासाची वेळ असल्याने शालेय विद्यार्थी वगळता वर्दळ तशी कमी होती. आठवडे बाजारच्या दिवशी सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरत असल्याने प्राथमिक शाळांचे शिक्षकही सुदैवाने आपल्या शाळेकडे याचवेळी जात होते. त्याच ठिकाणी प्राथमिक शिक्षक किरण दहातोंडे व राहूल जाधव, प्राथमिक शाळेत जाण्यासाठी आपल्या गाडीतून निघाले असतानाच त्यांच्यासमोर हा प्रकार घडला. क्षणाचा ही विलंब न करता प्राथमिक शिक्षक किरण दहातोंडे व जाधव व गावातील प्रशांत बोरुडे आण्णा दहातोंडे यांनी सदर मुलाला उचलून घेत आपल्या गाडीत घेऊन गावातील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्या ठिकाणी प्रथमोपचार केल्यानंतर डॉक्टर निकाळजे यांनी परिस्थिती पाहता सदर जखमी मुलाला पुढील उपचारासाठी नगराला हलवण्यात आले आहे .

दरम्यान सदर घटनेने सर्व पालकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले असून चांदा विद्यालयाची विद्यार्थी संख्या ही जवळपास 2000 च्या आसपास आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच भरपूर गर्दी असते. त्यातच चांदा कुकाणा रस्ता हा रहदारीचा असल्याने वाहनांची ये जा मोठ्या प्रमाणात सुरू असते. मात्र अवजड वाहनही या रस्त्यावरून भरधाव वेगाने जात असतात .शाळा परिसरात वर्दळ जास्त असल्याने या ठिकाणी सततच छोटे-मोठे अपघात घडत आहेत. मात्र आज सोमनाथ दहातोंडे हा विदयार्थी गंभीर जखमी झाल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

शाळा परिसरात असणारी वर्दळ लक्षात घेता या ठिकाणी रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी वारंवार करून ही बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. गावची वाढती लोकसंख्या आणि शाळेची मोठी विदयार्थी संख्या पाहता या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतुक नियंत्रक पोलिसांची नेमणुक करावी अशी मागणी चांदा ग्रामस्थांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com