नवीन राष्ट्रीय महामार्ग ओतूर-जुन्नर ते गोंदे फाटा सिन्नरपर्यंत वाढवावा - वाकचौरे

File Photo
File Photo

अकोले |प्रतिनिधी| Akole

भीमाशंकर ते त्र्यंबकेश्वर हे दोन ज्योतिर्लिंग जोडण्यासाठी ज्योतिर्लिंग राष्ट्रीय महामार्ग जोडणी प्रकल्पांतर्गत तळेघर-बनकर फाटा हा नवीन राष्ट्रीय महामार्ग ओतूर जुन्नर ते गोंदे फाटा सिन्नरपर्यंत वाढवावा, अशी मागणी भाजपा सोशल मीडिया सेल उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब वाकचौरे यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री ना. नितीन गडकरी यांचेकडे केली आहे.

याबाबत ना. गडकरी यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग ज्योतिर्लिंग जोडणी प्रकल्पांतर्गत भीमाशंकर देवस्थानला जोडण्यासाठी बनकर फाटा - तळेघर या रस्त्याला नवीन राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्यावतीने घेण्यात आला आहे. याबद्दल अभिनंदन आहे. महाराष्ट्र राज्यातील त्र्यंबकेश्वर ते भीमाशंकर हे दोन ज्योतिर्लिंग जोडण्यासाठी तळेघर-बनकर फाटा या नवीन राष्ट्रीय महामार्गला कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग 222 ओतूर ते गोंदे फाटा राष्ट्रीय महामार्ग 50 (सिन्नर-नाशिक) 80 किमी पर्यंतच्या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गचा दर्जा देण्यात यावा.

बनकर फाटा ओतूर, ब्राह्मणवाडा, सुगाव फाटा, अकोले, देवठाण, गोंदे (सिन्नर) असा राष्ट्रीय महामार्ग झाला तर भीमाशंकर ते त्र्यंबकेश्वर हे दोन ज्योतिर्लिंग जोडले जातील. गोंदे येथे समृद्धी महामार्गाचा टोल नाका आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाला हा राष्ट्रीय महामार्ग जोडला जाईल व भिमाशंकरला जाणारे भाविक या मार्गाने जातील.

याचबरोबर अकोले तालुक्यातील पर्यटन विकास होईल. महर्षी अगस्ती महाराज देवस्थान, सत्यवचनी राजा हरिश्चंद्रगड, महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच शिखर कळसूबाई, छत्रपती शहाजी राजे यांची पहिली राजधानी शहागड, सर्वात मोठा वटवृक्ष पेमगिरी, छत्रपती शिवाजीराजे यांचे विश्रांती घेतलेले विश्रामगड हे सुद्धा जोडले जातील. भंडारदरा, निळवंडे, पिंपळगाव खांड धरण, रंधा फॉल, सांधन दरी हे पण येथून जवळच आहे. लागाचा घाट, वाशेरे घाट यांचा विकास होईल.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिवनेरी जुन्नर जन्मस्थळ, अष्टविनायक ओझर, लेण्याद्री याच महामार्गावर येतील. प्रभू श्रीराम पंचवटी पण याला जोडले जाईल.

शिवाय पुणे, नगर, नाशिक जिल्हे तर जुन्नर, अकोले, सिन्नर हे तालुके जोडले जाईल, असेही निवेदनात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com