
अहमदनगर (प्रतिनिधी)
नगरचे पालकमंत्री बदलाचा निर्णय विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर म्हणजे २० जूननंतर होईल. पालकमंत्रिपदाची जबाबदारी लवकरच दुसऱ्याच्या खांद्यावर सोपवली जाईल, नवीन पालकमंत्री येतील. सध्याचे पालकमंत्री....
हसन मुश्रीफ कोल्हापूरचे आहेत, नगरहून कोल्हापूरचे अंतर लांब पडते. त्यामुळे त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे नगरचे पालकमंत्री पद नको, अशी भावना व्यक्त केली. पक्षाच्या दोन मंत्र्यांच्या अटकेमुळे याबाबत निर्णय घेण्यास वेळ लागतो आहे. मात्र, २० जूननंतर म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर याचा निर्णय होईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिली.
राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी भवनात झालेल्या कार्यक्रमानंतर जिल्हाध्यक्ष फाळके यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी फाळके म्हणाले, पक्षाच्या जिल्हा संघटनेने श्रेष्ठींकडे जिल्ह्याला आणखी एका मंत्रीपद देण्याची तसेच बदलानंतर पालकमंत्री पद जिल्ह्याकडेच ठेवावे, अशीही मागणी केलेली आहे. जिल्ह्यात पक्षाचे सहा आमदार आहेत. त्यामुळे आणखी एक मंत्रिपद मिळावे, अशी मागणी आम्ही केली आहे. वर्धापन दिनाची भेट म्हणून आम्हाला आणखी एक मंत्रिपद मिळावे, अशी आमची अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारमध्ये काम करतांना राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी त्यांच्याकडे असलेल्या खात्यांच्या माध्यमातून जी कामे केली, त्याचा अहवाल यानिमित्त पक्षातर्फे सादर करण्यात आला आहे, असे सांगून फाळके म्हणाले, करोनाचा संकट काळात महाविकास आघाडीच्या सरकारने चांगले काम केले. पक्ष सामाजिक कामांसोबतच निवडणुकांमध्येही पक्ष चांगली कामगिरी करीत आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही ताकदीने लढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सर्वच ठिकाणी महाविकास आघाडी कायम राहील, असे नाही.
स्थानिक पातळीवरील परिस्थिती नुसार निर्णय घेतले जातील व तशी मुभा आम्हाला पक्षाने दिली आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत भाजपशी युती केली जाणार नाही, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये पक्षांतराला काही अडचण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
...म्हणून राम शिंदे यांना उमेदवारी
कर्जत-जामखेडचे भाजपचे माजी मंत्री व माजी आमदार प्रा. राम शिंदे यांना ताकद देण्यासाठी नव्हे, तर पुढील विधानसभा निवडणुकीत ते निवडून आले नसते, म्हणून त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे, असा टोला फाळके यांना भाजपला लागावला. भाजपने प्रा. शिंदे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिल्यानंतर त्यांना कर्जत-जामखेडमध्ये व नगर जिल्ह्यात राजकीय ताकद देण्यासाठी भाजपने हा निर्णय घेतल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत असले तरी हा दावा फाळके यांनी खोडून काढला.
जिल्ह्यात लवकरच उलथापालथ
आगामी जिल्हा परिषद व नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठी राजकीय उलथापालथ होईल, असे सूतोवाच करून फाळके म्हणाले, लवकरच जिल्हा परिषदेचे दोन सदस्य राष्ट्रवादीत प्रवेश करतील. त्यापैकी एक बाळासाहेब हराळ व दुसरे भाजपचे आणि विखे यांच्या जवळचे आहेत. पुढील गुरुवारी मुंबईत उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होईल, असे ते म्हणाले. मात्र, विखेयांच्या जवळच्या व्यक्तीचे नाव त्यांनी जाहीर केले नाही.