
संगमनेर |वार्ताहर| Sangamner
संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शाळा सुरू करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. आज सोमवार दिनांक 13 जून पासून शाळांची घंटा वाजणार आहे. प्रत्यक्षात विद्यार्थी 15 जूनला शाळेत येणार आहेत. मात्र शैक्षणिक वर्षाचा आरंभ 13 जूनपासूनच करण्याचे सूचित करण्यात आले आहे.
विदर्भातील उष्णतेची पातळी लक्षात घेता तेथील शाळा चौथा सोमवार दि. 27 जून 2022 रोजी सुरू होतील. शाळा सुरू करताना स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या स्वरूपाची कार्यवाही करण्याचे परिपत्रक शासनाने जारी केले आहे. 13 जून 2022 ते 14 जून 2022 रोजी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांनी उपस्थित राहून शाळेची स्वच्छता करणे, शाळेचे सौंदर्यीकरण करणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे कोविड- 19 प्रादूर्भाव तसेच आरोग्यविषयक बाबींचे अनुषंगाने उद्बोधन करणे याचे आयोजन करण्यात यावे. दि. 15 जून 2022 पासून विद्यार्थ्यांसह प्रत्यक्षात शाळा सुरू कराव्यात. विदर्भातील शाळांबाबत दि. 27 जून 2022 ते 28 जून 2022 पूर्वतयारी, 29 जून 2022 पासून विद्यार्थ्यांसह प्रत्यक्षात शाळा सुरू होतील.
शालेय शिक्षक वृंद व इतर कर्मचारी यांनी कोवीड- 19 प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन्ही मात्रा व त्यानंतरची बुस्टर मात्रा घेण्यासाठी विभाग स्तरावर आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. वयोगट 12 वर्षे व त्यापुढील विद्यार्थ्यांचे कोवीड-19 प्रतिबंधात्मक लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यावर भर द्यावा. कोवीड योग्य वर्तनाचे शाळा व शालेय परिसरात पालन होईल याबाबत शालेय प्रशासनाने दक्षता घ्यावी. ज्या विद्यार्थ्यांना ताप किंवा इतर कोवीड सदृश लक्षणे आढळल्यास अशा पाल्यांना शाळेत न पाठविण्याबाबत संबंधित पालकांना शाळेने सूचना द्याव्यात व शाळेत उपस्थित विद्यार्थ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यामध्ये ताप किंवा इतर कोवीड सदृश लक्षणे आढळल्यास अशा विद्यार्थ्याचे शालेय स्तरावर तात्काळ विलगीकरण करण्यासाठीची कार्यवाही करण्यात यावी.
कोवीड सदृश लक्षणे आढळलेल्या विद्यार्थ्यांची तात्काळ रॅपीड अॅन्टीजेन टेस्ट किंवा आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी कार्यवाही करावी. ज्या विद्यार्थ्यांची कोवीड-19 चाचणी पॉझीटीव्ह आली असेल त्या विद्यार्थ्यांच्या निकट संपर्कात असलेल्या विद्यार्थ्यांची सुध्दा रॅपीड अॅन्टीजेन टेस्ट किंवा आरटीपीसीआर टेस्ट संदर्भाने कार्यवाही करावी. कोविड परिस्थितीमध्ये शालेय शिक्षण विभागाकडून, आरोग्य विभागाकडून स्थानिक आपत्ती कक्षाकडून वेळोवेळी निर्देश/सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत तसेच यापुढे करण्यात आल्यास त्यांचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घ्यावी.
शाळापूर्व तयारीमध्ये स्थानिक प्रशासनाने विद्यार्थ्यांचे स्वास्थ्य व सुरक्षितता कशी चांगली राखता येईल याकडे जातीने लक्ष द्यावे. शाळेमध्ये येणार्या मुलांचे/पालकांचे कोविड- 19 प्रादूर्भावाच्या अनुषंगाने प्रबोधन/उद्बोधन करण्यात यावे या प्रकारच्या सूचना शासनाने शाळा सुरू करण्यापूर्वी काढलेल्या पत्रकात देण्यात आल्या आहेत.