
नेवासा|तालुका प्रतिनिधी|Newasa
नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे शनिवारी मध्यरात्रीनंतर एक वाजेच्या दरम्यान पिता-पुत्रावर शस्त्राने हल्ला करून अडीच लाख रुपये रोख व सोन्याचांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. या जबरी चोरीतील दोघा संशयितांना नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने नेवासा तालुक्यातील गोंडेगाव येथे अवघ्या 12 तासांत जेरबंद केले आहे. हे दोघेही सख्खे भाऊ आहेत.
शनिवारी 8 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीनंतर 9 ऑगस्टच्या पहाटे एक वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी बापूसाहेब केशव मोटे (वय 52) रा. वडाळा बहिरोबा यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. बापूसाहेब मोटे व त्यांच्या मुलावर प्राणघातक हत्याराने वार करून त्यांना जखमी केले.
त्यांच्याकडून 2 लाख 45 हजार रुपयांची रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागिने हत्याराचा धाक दाखवून चोरून नेले. बापूसाहेब मोटे यांनी शनीशिंगणापूर पोलीस ठाण्यात त्वरीत फिर्याद दाखल केली. त्यावरून 104/2020 भारतीय दंड विधान कलम 394 व 397 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. दिपाली काळे, शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, शिंगणापूरचे पोलीस निरीक्षक वसंत भोये, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे उपनिरीक्षक गणेश इंगळे यांनी घटानस्थळी भेट देवून गुन्ह्यातील फिर्यादी व साक्षीदार यांच्याकडे चौकशी करुन आरोपीचे वर्णन, गुन्ह्याची पद्धती याची महिती घेतली.
श्वानपथकाने दाखविलेल्या दिशेने आरोपी पळून गेल्याचे निश्चित करुन स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकातील हवालदार सुनील चव्हाण, हवालदार संदीप घोडके, पोलीस नाईक ज्ञानेश्वर शिंदे, दिनेश मोरे, रवी सोनटक्के, रवींद्र कर्डीले, संतोष लोढे, कॉन्स्टेबल प्रकाश वाघ आदींनी गोंडेगाव येथे संशयितांच्या वस्तीवर छापा टाकून साक्षीदार यांनी सांगितलेल्या वर्णनाचे संशयित आरोपी बाबाखान ऊर्फ बाबासाहेब शिवाजी भोसले (वय 40) व यासीनखाँ ऊर्फ अनिल शिवाजी भोसले (वय 38) दोघेही रा. गोंडेगाव ता. नेवासा यांच्याकडे योग्य ती विचारपूस केली. सदर गुन्हा या दोघांनीच केल्याचे जवळपास निष्पन्न झाल्याने ताब्यात घेतलेल्या आरोपींना शिंगणापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
दोघेही आरोपी सराईत गुन्हेगार
अटक केलेल्या आरोपींमधील बाबाखान ऊर्फ बाबासाहेब शिवाजी भोसले याच्यावर नेवासा पोलीस ठाण्यात 2004 मध्ये जबरी चोरीचा, एमआयडीसी वाळूंज पोलीस ठाण्यात 2002 मध्ये अपहरण व अन्य गुन्हे तर 1999 मध्ये सोनई पोलीस ठाण्यात कलम 396 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. दुसरा आरोपी यासीनखाँ ऊर्फ अनिल शिवाजी भोसले याच्यावर 2011 मध्ये गंगापूर पोलीस ठाण्यात कलम 396, 412, 302 आदी कलमान्वये, 2016 मध्ये नेवासा पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट प्रमाणे, 2016 मध्येच नेवासा ठाण्यात 436, 325 आदी कलमान्वये तर 2019 मध्ये सोनई पोलीस ठाण्यात 395 व 452 आदी विविध गुन्हे दाखल आहेत.