‘चेस दी वायरस’ संकल्पना राबविण्याची गरज
सार्वमत

‘चेस दी वायरस’ संकल्पना राबविण्याची गरज

मुख्यमंत्री ठाकरे ; जिल्ह्यातील आरोग्य सेवा उपक्रमांचा ई-प्रणाली द्वारे शुभारंभ

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

करोना संकटाला न घाबरता सामोरे जात आहोत. नगर जिल्ह्यात मिशन झीरो अंतर्गत रुग्णांच्या अधिकाधिक चाचण्या करून बाधितांवर वेळेत उपचार करा. वयोवृद्ध आणि इतर आजाराने बाधीत असलेल्या व्यक्तीवर विशेष लक्ष द्या. ‘चेस दी व्हायरस’ याप्रमाणे लक्षणे असणार्‍या व्यक्तीपर्यंत आरोग्य यंत्रणेने पोहोचले पाहिजे. त्यामुळे संसर्गाची साखळी तुटण्यास मदत होईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा प्रशासन आणि शिवप्यारीबाई धूत चॅरीटेबल ट्रस्ट यांच्यावतीने जिल्हा रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आलेला 25 बेडचे अत्याधुनिक यंत्रणेने सुसज्ज आयसीयू विभाग, भारतीय जैन संघटनेच्यावतीने नगर महानगरपालिका क्षेत्रात राबवण्यात येत असलेला मिशन झीरो उपक्रम आणि जिल्हा रुग्णालय येथील आरटीपीसीआर लॅबच्या चाचण्यांच्या समवेत क्षमतेत वाढ करण्याच्या कार्यक्रमांचा शुभारंभ मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते ई-प्रणालीद्वारे करण्यात आला.

यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आधी मान्यवर या कार्यक्रमात ई-प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालय येथे खासदार सदाशिव लोखंडे, आ. डॉ. सुधीर तांबे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, धूत चॅरिटेबल ट्रस्टचे अनुराग धूत, भारतीय जैन संघटनेचे आदेश चंगेडिया, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे आदींची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, करोना विरुद्धच्या लढाईला एकत्रितपणे सामोरे जात आहोत. आपण जे काम करतोय ते जनतेच्या हितासाठी करतोय. त्याचमुळे त्याला चहूबाजूंनी सहकार्य मिळत आहे. यामुळे कामाचा वेग वाढला आहे. करोनावर औषध सापडलेले नाही. त्यामुळे वेळीच लक्षणे आढळणार्‍या रुग्णांना शोधून त्यांच्यावर आपण उपचार करत आहोत. चाचण्यांची संख्या वाढत आहेय राज्यात प्रयोग शाळांची संख्या आता वाढली आहे.

आपण हे सर्व प्रयत्न करतो आहोत. याला सामाजिक संस्था पुढे येऊन सहकार्य करीत आहेत, ही अतिशय अभिमानाची बाब आहे, असे ते म्हणाले. लॉकडाऊननंतर काही गोष्टींमध्ये शिथिलता दिली. दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, यामुळे गाफील राहून चालणार नाही. सदैव सतर्क राहावे लागणार आहे. मृत्यू दर कमी ठेवणे, चाचण्यांची संख्या वाढवून रुग्णांवर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातही मिशन झीरो अंतर्गत चेस द व्हायरस असे केले पाहिजे. जिल्ह्यातील डॉक्टरांचा टास्क फोर्स आपण निर्माण केला आहे.

महसूलमंत्री थोरात म्हणाले, करोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे प्रचंड काम करत आहेत. धारावी येथील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. जिल्हयात चाचण्यांची संख्या वाढत आहे.

त्यामुळे बाधीत रुग्णांची संख्या जरी वाढणार असली तरी, त्यास उपचार वेळेत करणे शक्य होणार आहे. मात्र, आपल्याला अजूनही काळजी घ्यावी लागणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आरोग्य मंत्री टोपे, पालकमंत्री मुश्रीफ यांचे मनोगत झाले. जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी जिल्ह्यातील कोरोना विषयक परिस्थिती आणि त्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. आभार डॉ. पोखर्णा यांनी मानले.

Deshdoot
www.deshdoot.com