भूजल पातळी वाढविण्यासाठी कृती कार्यक्रमांची गरज - डॉ.मल्लीनाथ कलशट्टी

भूजल पातळी वाढविण्यासाठी कृती कार्यक्रमांची गरज - डॉ.मल्लीनाथ कलशट्टी

नेवासा (तालुका प्रतिनिधी) - पावसाचे पाणी हे अत्यंत महत्वाचे आहे. ते जमिनीत जिरविणे-मुरविणे ही तितकेच महत्वाचे झालेले आहे. राज्यातील सर्व गावांमध्ये भूजल पुनर्भरणाची चळवळ सुरू झाली पाहिजे.प्रत्येकाने आपले गावात पथदर्शी प्रयोग करावेत.त्यामुळे इतरांना त्यापासून स्फूर्ती मिळेल. या पुढील काळात भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रत्यक्ष कृती कार्यक्रमांची गरज आहे असे प्रतिपादन भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक डॉ.मल्लीनाथ कलशट्टी यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या पाणी पूरवठा आणि स्वच्छता विभाग , भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांचे वतीने आयोजित केलेल्या "आओ भूजल जाने" या शृंखलेतील 22 व्या वेबिनार मध्ये "पाण्याच्या शाश्वत उपलब्धतेसाठी पुनर्भरण" या विषयावरील परिसंवादा प्रसंगी सहभागी जलनायक,जलप्रेमी, जलसेवक व भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे उपसंचालक, वरिष्ठ व कनिष्ठ भूवैज्ञानिक यांचेशी संवाद साधतांना डॉ.कलशेट्टी बोलत होते.

यशदाच्या जलसाक्षरता  केंद्राचे संचालक आनंद पुसावळे,अहमदनगरचे जलप्रेमी सुखदेव फुलारी आदी,उल्हास आपटे,यशवंत लोणकर,सौ.सरोदे,सिद्धार्थ गायकवाड, आदी या वेबिनार मध्ये सहभागी झाले होते.

डॉ.कलशेट्टी पुढे म्हणाले,राज्यातील जनतेमध्ये भुजल विषयी जनजागृती करून भूजल पातळी वाढविण्याच्या कार्यात लोकसहभाग वाढविण्यासाठी जनजागृती अभियान राबविले जात आहे.आता फिल्डवर जाऊन प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आलेली आहे.जनतेला जलपुनर्भरणाचे महत्व कळावे,त्याची तंत्र शुद्ध माहिती मिळावी यासाठी व्हिडीओ,पोवाडे,माहिती पत्रके,स्टिकर्स तयार करण्यात येत आहेत.ग्रामपंचायतीनी 15 व्या वित्त आयोगातून,रोजगार हमी योजनेतून ग्रामपंचायत कार्यालयावर छत पाऊस पाणी संकलन करणारे प्रकल्प राबवावेत, त्याच बरोबर शाळांच्या इमारतीवर ही योजना राबवून जल पुनर्भरण करावे.

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे निवृत्त सहसंचालक (अभियांत्रिकी) श्रीनिवास देशपांडे यांनी "पाण्याच्या शाश्वत उपलब्धतेसाठी पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण" या विषयावरील सादरीकरण करून जल पुरणभरणाचे महत्व पटवून दिले.

ते म्हणाले देशातील साधारणतः 60 टक्के शेतीचे सिंचन हे भूजलावर आधारित विहिरी,विंधन विहिरी (बोअर) या स्रोतांवरवर अवलंबून आहे. देशात निर्माण होत असलेल्या वीजे पैकी 35 टक्के वीज पाण्याच्या पंपिंगसाठी खर्ची होते. ज्यामध्ये शेतीच्या सिंचनाच्या पंपिंगसाठी वीजेचा वापर हा सर्वात मोठा घटक आहे. शेतकरी जितके जास्त पीक उत्पादन करेल त्यावर फक्त शेतकऱ्याचाच नव्हे तर आपल्या देशाचा देखील आर्थिक विकास अवलंबून आहे.अद्यावत उच्च दाबाच्या विंधन यंत्रांची निर्मिती झाल्याने शेतीच्या सिंचनासाठी एक दिवसात 1000 फूट खोल विंधन विहिरी खुदाई करण्याची सुविधा झाल्याने बोअरचे खोली आणि संख्या ही वाढली,परिणामी भूजल उपसा ही वाढला.जो शेतकरी स्वतःचे पीक वाचविण्यासाठी विंधन विहिरीवर आणि सबमर्सिबल पंपावर एवढा खर्च करतो,तो पुनर्भरणाच्या उपायांवर खर्च करण्यास मागे पुढे पाहणार नाही किंवा शासनाच्या कुठल्याही सबसिडीची अपेक्षा करणार नाही. तथापि त्याला त्याच्या शेतात पडणारा पाऊस व्यवस्थित संकलित केल्यास व त्याचे पुनर्भरण आपल्याच शेतातील विहिरी आणि विधणविहिरींना केल्यास ते स्रोत शाश्वत करता येतात याची तांत्रिक माहितीच नाही. अतिखोल विंधनविहिरी खोदण्याच्या सुविधा जितक्या सुलभ रित्या गावोगावी उपलब्ध झाल्या, तेवढ्या प्रमाणात पुनर्भरणाच्या सेवा देणाऱ्या संस्था , यंत्रणा उपलब्ध झाल्या नाहीत.

या अतिखोल विंधन विहिरीसाठी आणि सबमर्सिबल पंपासाठी शासनाने कोणत्याही प्रकारची सबसिडी दिल्याचे ऐकिवात नाही. यासाठी लाखो रुपये शेतकरी स्वतःच खर्च करतो. एक दोन वर्षात या विधन विहिरीचे पाणी कमी झाले किंवा संपले कि दुसरी आणखी खोल विंधन विहिर घेतो,अधिक क्षमतेचा सबमर्सिबल पंप खरेदी केला जात किंवा आधीच्या विंधन विहिरीतील सबमर्सिबल पंप पाईप वाढवून या नवीन विंधन विहिरीत बसविला जातो. आणखी एक दोन वर्षात आणखी एक विंधन विहीर घेतली जाते. शेतीच्या पीक सिंचनासाठी हे सर्व आवश्यक आहे.

पावसाच्या पाण्याचे पुनर्भरणाच्या सेवा देणाऱ्या यंत्रणा देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्माण करणे हि आता काळाची गरज झाली आहे. पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करण्यासाठी आपल्या शेतातील ह्याच सर्व विंधन विहिरींचा वापर अतिशय कमी खर्चात करता येऊ शकतो. या बाबतचे तांत्रिक सहाय्य त्यांना देणे अत्यंत आवश्यक आहे.

नगरचे जलमित्र सुखदेव फुलारी म्हणाले,भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांचे पुढाकाराने भुजल पुनर्भरण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, विहीर-बोअर पुनर्भरण यावर अनेक वेबिनार झाली, अनेक तज्ञांनी मार्गदर्शन केले.यामुळे आपल्याकडे माहितीचे प्रचंड भांडार निर्माण झालेले आहे.आता वेळ आली आहे ती प्रत्यक्ष कृतीची.भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे अधिकारी-कर्मचारी व गावोगावात काम करणारे जल साक्षरता चालवळीतील जलनायक,जलकर्मी,जलदूत,जळसेवक,ग्रामस्तरावरील सर्व शासकीय कर्मचारी व ग्रामपंचायत सदस्य यांनी हातात हात घालून लोकांना प्रेरित करण्यासाठी भूजल पुनर्भरणाची प्रत्यक्ष कामे केली पाहिजेत.

भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे मुख्य खोदण अभियंता हनुमंत ढोकळे यांनी ही मार्गदर्शन केले. रेनवॉटर हार्वेस्टिंगचे सल्लागार मिलिंद देशपांडे यांनी आभार मानले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com