जिल्ह्यात पालकमंत्री मुश्रीफ यांना अडवून दाखवाच

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांचे भाजपला प्रति आव्हान
जिल्ह्यात पालकमंत्री मुश्रीफ यांना अडवून दाखवाच

करंजी |प्रतिनिधी| Karanji

जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आजारी पडल्यामुळे ते नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी येऊ शकले नाहीत त्याचेच भांडवल करीत भाजपच्या काही पदाधिकार्‍यांनी पालकमंत्र्यांना जिल्ह्यात येऊ देणार नसल्याचा इशारा दिला. आजारपणाचे देखील भाजपकडून राजकारण होत असल्याने पालकमंत्र्यांना जिल्ह्यात येण्यास कोणीही रोखू शकत नाही. त्यांनी रोखून दाखवावेच असे प्रति आव्हान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजू शेख यांनी दिले आहे.

याबाबत प्रसिद्धीमाध्यमांना माहिती देताना शेख यांनी सांगितले की राज्यातील महा विकास आघाडीचे सरकार शेतकर्‍यांसोबत असून जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे झालेले शेतकर्‍यांचे नुकसान, झालेली हानी न भरून येणारी असली तरी शेतकर्‍याला सरकारच्या माध्यमातून निश्चित मदत केली जाणार असून पंचनामे पूर्ण होताच प्रशासनाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मदत केली जाणार आहे.

पाथर्डी शेवगाव तालुक्यात झालेल्या ढगफुटीमुळे या नुकसानग्रस्त भागाची राज्याचे मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तात्काळ पाहणी करून प्रशासनाला योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. पालकमंत्री आजारी पडल्यामुळे ते जिल्ह्यात येऊ शकले नाहीत त्याचेच विरोधकांकडून भांडवल केले जात असून ही खेदाची बाब आहे. पालकमंत्र्यांना जिल्ह्यात येण्यास कोणी रोखू शकत नाही आणि तसा कोणी प्रयत्न केल्यास तो राष्ट्रवादी विकास आघाडीचे कार्यकर्ते हाणून पाडतील असे राजू शेख यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे जशास तसे उत्तर

राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यासह त्यांना विविध प्रकारे घेरण्याचे प्रयत्न भाजप कडून सुरू आहेत. यास राष्ट्रवादीकडून जशास तसे उत्तर देण्यात येत आहे. किरीट सोमय्या यांना कोल्हापूरला येण्यापासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक झाली होती. तर आता अहमदनगर जिल्ह्यात त्यांना फिरकू देणार नसल्याचे भाजप पदाधिकारी म्हणताच राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी प्रति आव्हान दिल्याचे चित्र आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com