मंत्रिमंडळ विस्तार होऊ दे, मग दाखवतो, असे 9 ते 10 जणांचे निरोप आहे

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. पाटील यांचा शिंदे गटाच्या आमदारांबाबत दावा
मंत्रिमंडळ विस्तार होऊ दे, मग दाखवतो, असे 9 ते 10 जणांचे निरोप आहे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नव्या सरकारमधील कोणी थेट आमच्या संपर्कात नाही. पण त्यांच्या भावना व निरोप आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. मंत्रिमंडळ विस्तार होऊ दे, मग दाखवतो, असे 9 ते 10 जणांचे निरोप आहेत. मध्यावधी निवडणुका कधीही लागू शकतात व त्यासाठी आमची तयारीही आहे. भाजपने 40 जणांच्या टोळीबरोबर-गटाबरोबर सत्ता स्थापन केली आहे, पक्षासमवेत नाही. त्यामुळे जोपर्यंत त्यांचा उपयोग आहे, तोपर्यंत भाजप त्यांना घेऊन जाईल व त्यांचा उपयोग होत नाही, हे जाणवल्यावर त्यांना कधी नारळ देईल, हे त्यांनाही समजणार नाही, असा दावाही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी नगरमध्ये केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवशीय मंथन- वेध भविष्याचा प्रशिक्षण शिबीर आज शुक्रवारी (दि. 4 ) व उद्या शनिवारी (दि. 5) शिर्डी येथे होत आहे. त्याची माहिती प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींना दिली. यावेळी नगरचे आ. संग्राम जगताप, पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार आदींसह अन्य उपस्थित होते. फॉक्सकॉनपाठोपाठ टाटाचा प्रकल्प व एअर बस प्रकल्पही बडोद्याला जाणे राज्याला भूषणावह नाही.

या प्रकल्पांमुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या 4 लाखावर रोजगार उपलब्ध झाला असता. महाराष्ट्रात अभियांत्रिकीची प्रगती चांगली आहे. पण प्रकल्प गुजरातला गेल्याने आता महाराष्ट्रातील मुलांना गुजरातला जाऊन नोकरी करावी लागेल, असा दावा करून ते म्हणाले, राज्य सरकारने आज 75 हजार जणांना नियुक्ती दिल्याचा गाजावाजा केला असला तरी यासाठीच्या निवडी व परीक्षा महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाल्या होत्या. शिवाय अशा नियुक्त्यांच्या गाजावाजा करण्याची पद्धत नाही, पण नव्या सरकारमध्ये आत्मविश्वासच नाही व सरकारविरोधातील जनमत कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न अशा कार्यक्रमांतून सुरू आहे.

खोके वाटपाचा वाद अजून मिटत नाही, सरकारचे 100 दिवस कोठेही दिसत नाहीत, सरकारला अजूनही ग्रीप आलेली नाही, यांचे सरकार फार काळ टिकणार नाही असे प्रशासनालाही वाटत आहे, सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार आहे, आमदार-आमदारांत भांडणे सुरू आहेत, कोणी किती खोके घेतले यातून हे खोके घेऊन बदलतात, अशी भावना जनतेची झाली आहे, असा दावाही पाटील यांनी केला.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांना अपात्र ठरवले तर शिवसेनेचे राहिलेले आ. उद्धव ठाकरेंसमवेत येतील, असा दावाही पाटील यांनी केला. प्रकाश आंबेडकर व उध्दव ठाकरे एकत्र येण्याच्या या जर-तरच्या गोष्टी आहेत. महाविकास आघाडीतील तीन पक्षांपैकी कोणी बाहेर जाईल, असे वाटत नाही. तसेच स्थानिक परिस्थिती पाहून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढवायच्या की स्वतंत्र ते ठरवू, पण या सरकारमध्ये आत्मविश्वास नसल्याने ते लवकर निवडणुका घेतील, असे वाटत नाही, असे भाष्यही पाटील यांनी केले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळातील औद्योगिक कारभाराची श्वेतपत्रिका नव्या सरकारने काढण्यास हरकत नाही. पण फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून घालवल्याची जबाबदारी नव्या सरकारला टाळता येणार नाही. त्यांच्या दुर्लक्षामुळे म्हणा अथवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुजरातला घाबरल्यामुळे म्हणा, पण फॉक्सकॉनच्या अग्रवालांना भेटले नाही, तो प्रकल्प गुजरातला गेल्यावर हे दोघे गप्प राहिले, असा आरोप आ. पाटील यांनी केला.

आताही सरकारच पडेल

काँग्रेसचे चिंतन शिबिर शिर्डीला झाल्यावर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले होते व आता राष्ट्रवादीचे मंथन शिबिर झाल्यावर राष्ट्रवादी पक्ष फुटेल, असा दावा नगरचे भाजपचे खासदार ़डॉ. सुजय विखे यांनी केला आहे. यावर बोलताना पाटील म्हणाले, त्या शिबिरानंतर सरकार पडले होते, पण पक्ष फुटला नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादीचे शिबीर झाल्यावर पक्ष फुटणार नाही तर राज्यातील सध्याचे सरकारच पडेल, बघाच तुम्ही, असा दावाही त्यांनी केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com