
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
एप्रिल महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 2 आणि 3 एप्रिलला राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत नगर जिल्हा सहकारी बँकेतील पराभवावर चर्चा होऊन दोषींवर काय कारवाई होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे नगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीत झालेल्या दगाफटक्याचा विषय मागे पडला असून मुंबईच्या बैठकीत याविषयावर मंथन होऊन दोषींवर कारवाई होणार असल्याचा दावा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या एका गटाकडून करण्यात आला आहे.
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीत बहुमत असताना देखील राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काही संचालकांनी भाजपचे संचालक असणारे शिवाजी कर्डिले यांच्या बाजूने मतदान केले. यावेळी झालेले मतदान हे गोपनीय असले तरी अध्यक्षपदासाठी इच्छुक असणारे संचालक चंद्रशेखर घुले यांच्या नावाला विरोध करणार्या संचालकांनी मतदानादरम्यान पक्षादेशा झुगारल्याचा दावा राष्ट्रवादीमधील एका गटाने केला आहे. तसेच याप्रकरणी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे.
यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची मुंबईत होणारी बैठकीला महत्व आले आहे. यापूर्वीच पक्षाचे जिल्हा निरिक्षक अंकूश काकडे यांनी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेणार्यांवर कडक कारवाई होणार असल्याचे सांगितलेले आहे. मात्र, राज्यातील राजकीय स्थिती, अर्थसंकल्पीय अधिवेशन यामुळे नगर जिल्हा बँकेचा विषय काहीसा मागे पडला आहे. मात्र, मुंबईत पक्षाच्या राज्यस्तरीय आढावा बैठकीच्या निमित्ताने जिल्हा राष्ट्रवादीमधील खदखद पुन्हा उफाळून येणार आहे. यामुळे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत घडलेल्या महानाट्यावर पक्षाचे नेते आ. अजित पवार या भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण त्यांनी दिलेल्या आदेश झुगारून पक्षाच्या काही संचालकांनी भाजपला मतदान केलेले आहे.
जिल्हा राष्ट्रवादी फुटीच्या मार्गावर
नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाची ताकद मोठी आहे. मात्र, अलिकडच्या काळात जिल्ह्यात पक्ष एकसंघ दिसत नाही. अनेक घटना वा प्रसंग यावरून जिल्हा राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडलेले दिसत आहे. एक गट हा साखर सम्राटांचा आणि ज्येष्ठ नेत्यांचा असून दुसरा गट नगर दक्षिणेतील दुष्काळी पट्यातील आणि तरूणांचा आहे. या गटाला पक्षातील काही पदाधिकारी यांच्याकडून फुस लावण्याचे काम सुरू असून यामुळे जिल्हा राष्ट्रवादीमध्ये फुट पडण्याची शक्यता आहे. यासर्व प्रकारावर पक्षाचे नेते काय निर्णय घेणार याकडे राज्याचे लक्ष राहणार आहे. यात विशेष म्हणजे जिल्ह्यातील काही नेते खा. शरद पवार यांचे लाडके, काही नेते आ. अजित पवार यांना मानणारे तर काही नेते प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचे नातेवाईक आहेत. यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीत पक्षातील गटा-तटाचे त्रांगडे कसे सुटणार हे पाहवे लागणार आहे.