राष्ट्रवादीतही पक्षीय संघटनात्मक संघर्ष !

मागासवर्गीय सेलच्या प्रमुखांनी खा. सुळेंसमोर व्यक्त केली खदखद
राष्ट्रवादीतही पक्षीय संघटनात्मक संघर्ष !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राष्ट्रवादीच्या पदाधिकारी संवाद मेळाव्यात पक्षातील संघटात्मक संघर्षसमोर आला. काही मागासवर्गीय सेलच्या जिल्हाध्यक्षांनी खा. सुप्रिया सुळे यांच्यासमोर त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून देत, आमच्याकडेही लक्ष द्या, अशी आर्त हाक यावेळी दिली. खा. सुळे यांनी देखील शांतपणे या पदाधिकार्‍यांचे म्हणणे ऐकून घेतले. आता खा. सुळे त्यावर काही लक्ष देणार का? याकडे राष्ट्रवादीच्या गोटाचे लक्ष राहणार आहे.

राष्ट्रवादी भवन येथे मंगळवारी खा. सुळे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांचा संवाद मेळावा झाला. सुरूवातीला जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी महिला जिल्हाध्यक्षा, युवकचे जिल्हाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांना चिमटे काढल्यानंतर राष्ट्रवादी सामाजिक न्याय सेलचे जिल्हाध्यक्ष अभिजीत ससाणे यांनी त्यांच्या भाषणात जाहीरपणे आपली खंत बोलून दाखवली. जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या काही तालुकाध्यक्षांच्या निवडी बाकी असून याबाबत संबंधित तालुकाध्यक्षांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्याकडून या सेलच्या तालुकाध्यक्ष निवडीबाबत कोणताच प्रतिसाद मिळत नाही. पक्षातील अंतर्गत संघर्ष थांबला पाहिजे, अशी जोरदार मागणी केली.

विमुक्त जाती-जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष मनू शिंदे यांनी पक्षातील गरीब कार्यकर्त्यांना त्रास होत आहे. पक्षांतर्गत आम्हाला डावले जात आहे. पक्षातील विमुक्त जाती-जमाती कार्यकर्त्यांच्या पोटाकडे लक्ष द्या. आमची अवस्था म्हणजे रिकाम्या पोटी लढणारे सैनिकांसारखी झाली आहे. निवडणुकांमध्ये मतदानाच्या पोटी सील होईपर्यंत आमचा वापर होतो नंतर आम्हाला कोणी विचारत नाही. राष्ट्रवादीच्या सर्वच मागसवर्गीय सेलची कमी अधिक प्रमाणात हीच अवस्था आहे. पक्षाच्या सामाजिक फंडातून आमच्यासाठी काहीतरी करा, अशी आर्त मागणी केली.

अन्य पदाधिकार्‍यांच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटलेला असल्याने ते कितीही वेळ पक्षाला देवू शकतात. आमचे तसेच नाही, आधी पोट आणि कुटूंब पाहून नंतर पक्षासाठी लढावे लागत आहे. ही परिस्थिती सुधारण्याची आवश्यकता असल्याचे शिंदे म्हणाले. आपल्या भाषणात खा. सुळे काही भाष्य करतील अशी अपेक्षा या सर्वांना होती प्रत्यक्षात खा. सुळे यांनी या विषयावर बोलणे टाळल्याने खंत व्यक्त करणार्‍यांची निराशा झाल्याची भावना यावेळी व्यक्त झाली.

Related Stories

No stories found.