
अहमदनगर (प्रतिनिधी)
जिल्ह्यातून जाणार्या तीन राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती व नूतनीकरण होण्याच्या मागणीसाठी मागील दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेले पारनेरचे राष्ट्रवादीचे आ. निलेश लंके यांची प्रकृती शुक्रवारी तिसर्या दिवशी खालावली आहे.
दरम्यान, राज्याचे विरोेधी पक्ष नेते अजित पवार आज शनिवारी (10 डिसेंबर) श्रीगोंद्याला पक्षाच्या तालुका प्रशिक्षण शिबिरासाठी येणार असल्याने त्यानंतर ते नगरला येऊन आ. लंके यांची उपोषणस्थळी भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, विरोधी पक्ष नेते आ. लंकेच्या उपोषणाला भेट देणार की नाही, याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.
नगर-पाथर्डी-नांदेड निर्मल महामार्ग (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61), नगर-राहुरी-शिर्डी-कोपरगाव रस्ता (राष्ट्रीय महामार्ग 160) व नगर-मिरजगाव-चापडगाव-करमाळा- टेंभुर्णी (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 561) या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी व नूतनीकरणासाठी आ. लंके यांच्यासह शिवशंकर राजळे, गहिनीनाथ शिरसाठ, हरिहर गर्जे, हरिदास जाधव, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड, अशोक सावंत, अॅड. सतीश पालवे आदींनी दोन दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे.
गुरुवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी आ. लंकेंना भेटून तिन्ही राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्ती व नूतनीकरण कामाच्या सुरू असलेल्या प्रक्रियेची माहिती दिली. मात्र, यावेळी आ. लंके यांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्यांवर त्यांना उत्तरे देता आली नाहीत. परिणामी, उपोषण आंदोलन शुक्रवारी तिसर्या दिवशीही सुरू होते. नगरचे माजी आमदार दादा कळमकर यांच्यासह नगर, शेवगाव, पाथर्डी व पारनेर तालुक्यातील विविध गावांच्या ग्रामस्थांनी उपोषणस्थळी येऊन आ. लंकेंना पाठिंबा दिला.
आ. लंके यांच्या मातोश्री शकुंतला लंके यांनी शुक्रवारी उपोषण स्थळी भेट दिली. यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. तीन दिवस उलटूनही प्रशासनाने आ. लंके यांच्या आंदोलनाची दखल घेतली नसल्याने तातडीने प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे असं मत आ. लंके यांच्या मातोश्रींनी म्हटले आहे. या रस्त्यावर अनेकांचे बळी गेले आहेत त्यामुळे तातडीने हा रस्ता दुरुस्त झाला पाहिजे असं शकुंतला लंके यांनी म्हटले आहे. तर आई वडिलांना लेकरांची काळजी असते त्यामुळे माझी आई इकडे आली असल्याचे आ.लंके म्हणाले.