राष्ट्रवादीचा गड शाबूत राखण्यात घुले यांना यश

चंद्रशेखर घुले
चंद्रशेखर घुले

शेवगाव | Shevgav

तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीत माजी आमदार चंद्रशेखर घुले व माजी सभापती डॉ. क्षितीज घुले यांच्या नेतृत्वाखालील ज्ञानेश्वर शेतकरी मंडळाने सर्वच्या सर्व 18 जागांवर विजय मिळवत विधानसभा गडाचे बुरुज राखण्यात यश मिळवले. तर आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखालील आदिनाथ शेतकरी मंडळाला एकही जागा मिळाली नाही. अगामी विधानसभा निवडणुकीत शेवगावकरांची भूमीका यातून समोर आली असून आ. राजळेंसाठी ही धोक्याची घंटा असल्याचे मानले जात आहे.

राजळे यांनी पाथर्डीत सत्ताधार्‍यांना पलटी देत विजय मिळवला. होम पिचवर राजळे व घुले विजयी ठरले. राजळे यांनी शेवगाव मध्येही विरोध करत आपले अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीत लावलेल्या ताकदीवरुन विखे, राजळे, घुले, ढाकणे यांचा येणार्‍या विधानसभा - लोकसभेसाठी जुळवाजुळव चालू असल्याचे दिसून आले. मात्र आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत कोण वरचढ ठरते हे महत्त्वाचे ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीत पाथर्डी - शेवगाव मतदार संघातून राजळे दोनदा निवडून आलेल्या आहेत. यामुळे शेवगाव तालुक्यातील मतदार येणार्‍या निवडणुकीत कोणाला साथ देतील हे निर्णायक ठरेल.

कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापनेपासून घुले यांच्या अधिपत्याखाली आहे. तालुक्यातील सेवा संस्था व ग्रामपंचायतींवर असलेले घुले यांचे वर्चस्व पाहता, ही निवडणुक एकतर्फी होणार असा अंदाज व्यक्त केला जात होता. तो खरा ठरला. माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी सर्व 18 जागांवर कुठल्याही पक्षाशी युती न करता सक्षम उमेदवार उभे केले. बाजार समितीचे माजी सभापती संजय कोळगे व अनिल मडके यांचा अपवाद वगळता इतर उर्वरीत 16 जागांवर त्यांच्या मर्जीतील नवीन चेहर्‍यांना संधी दिली. तालुक्यातील सेवा संस्था व ग्रामपंचायती सर्वाधिक संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पर्यायाने घुले बंधुंच्या ताब्यात आहेत. त्यामुळे ही निवडणुक सुरुवातीपासून त्यांच्यासाठी सोपी होती. तरी देखील सुरुवातीपासून खबरदारी घेत घुलेंनी पंचायत समिती गण निहाय मेळावे घेवून कार्यकर्ते, ग्रामपंचायत, सेवा संस्थांचे पदाधिकारी व मतदार यांच्यामध्ये मेळ घालण्याचे काम केले.

यावेळी प्रथमच आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपाच्या आमदार मोनिका राजळे यांनी राष्ट्रवादीला शह देण्यासाठी ही निवडणूक लढविण्याचा निर्धार केला. शिवसेना, मनसे, काँग्रेस यांना सोबत घेत सर्व 18 जागांवर उमेदवार उभे केले. खासदार सुजय विखे यांच्या उपस्थितीत मेळावा घेऊन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला. खासदार सुजय विखे व आमदार मोनिका राजळे यांनी सुरुवातीला मेळावा घेवून दाखवलेला उत्साह मात्र मतदान प्रक्रियेपर्यंत त्यांना टिकवता आला नाही.

दोघांचेही काहीसे दुर्लक्ष होत प्रचाराची पुढील मदार उमेदवारांच्या हवाली केल्याने नवखे असलेले भाजपचे उमेदवार राष्ट्रवादीच्या यंत्रणेपुढे फिके पडले. मात्र भाजपाने उमेदवारी देतानाच अभ्यासपुर्ण डावपेच टाकले असते तर काही प्रमाणात बदल शक्य झाला असता. . मात्र बहुतांश हुशार राजकारणी भविष्याचा वेध घेऊन वर्तमान काळात विचार पुर्वक आयुधे वापरत असतात. कदाचित तसेही झाले असेल.

राष्ट्रवादी व भाजपाने या निवडणुकीत प्रारंभी एकमेकांवर शाब्दिक वार करत निवडणुकीत आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. त्यामुळे निवडणुक चांगलीच गाजेल असे तयार झालेले चित्र पुढील काळात धुसर होत गेले. खासदार सुजय विखें यांच्या गनिमी काव्याचे आव्हान दिसले नाही. ही निवडणुक शेवगाव - पाथर्डी विधानसभा गड जिंकण्याच्या दृष्टीने विचार प्रवर्तक आहे.

विधानसभेसाठी अनेक जण इच्छूक आहेत. मात्र येणार्‍या निवडणुकीत स्वर्गीय तुकाराम पाटील गडाख यांच्या सारख्या एखादा लढवय्या उमेदवार उतरला तर आजचे चित्र बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com