राष्ट्रवादीची लोकसभेची तयारी सुरू

दक्षिण नगर आणि शिर्डीच्या चाचपणीसाठी शरद पवारांच्या उस्थितीत मंगळवारी बैठक
राष्ट्रवादीची लोकसभेची तयारी सुरू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कागदावर बल्लाढ्य दिसणार्‍या आणि विधानसभेत सर्वाधिक आमदार असणार्‍या नगर जिल्ह्यातील लोकसभेच्या शिर्डी आणि नगर दक्षिणेच्या जागेवर चाचपणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी 30 तारखेला (मंगळवारी) मुंबईत बैठक बोलावली आहे. या बैठकीत नगर जिल्ह्यातील शिर्डी आणि विशेष करून गेल्या काही पंचवार्षिकपासून राष्ट्रवादीला अपयश येत असलेल्या नगर दक्षिणेच्या लोकसभेच्या जागेवर कसा विजय मिळवता येईल, याबाबत रणनीती ठरवण्यात येणार असल्याची माहिती पक्षाच्या सुत्रांकडून देण्यात आली. दरम्यान, राष्ट्रवादीने 2024 मध्ये होणार्‍या लोकसभेच्या निवडणुकीसाठी आतापासून तयारी केली असून राज्यातील लोकसभेच्या सर्व जागासंदर्भात 30 आणि 31 मे रोजी मंबईत मतदारसंघ आण जिल्हानिहाय चाचणी बैठक बोलवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जिल्हानिहाय 30 आणि 31 तारेखला पक्षाचे अध्यक्ष खा. पवार यांच्या उपस्थितीत पक्षाचे पार्लेमेंटर सदस्यांच्या बैठकीत पक्षाचे आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. यावेळी विरोधपक्ष नेते आ. अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, ज्येष्ठ नेते प्रफुल पेटल, छगनराव भुजबळ, दिलीप वळसे पाटील, खा. सुप्रिया सुळे, पक्षाचे जिल्हा निरिक्षक अकूंश काकडे यांच्यासह त्यात्या जिल्ह्यातील प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

नगर जिल्ह्यातील लोकसभेच्या जागेसाठी मंगळवारी सकाळी सव्वा अकरा वाजता मुंबई बैठक होणार आहे. यात सुरूवातील नगर दक्षिण लोकसभेच्या जागेबाबत चर्चा होणार आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत संधी असून गेल्या काही पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीला अपयश येत आहे. या मतदारसंघात विधानसभेच्या सदस्य संख्येत राष्ट्रवादी अव्वल आहे. या लोकसभेच्या मतदारसंघात विधानसभेचे चार विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे आहेत. तर दोन ठिकाणी राष्ट्रवादीचा थोड्याच फरकाने पराभव झालेला आहे.

यात शेवगाव-पाथर्डीसह श्रीगोंदा विधानसभेचा समावेश आहे. यासह नगर शहर, पारनेर, कर्जत-जामखडे आणि राहुरी याठिकाणी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत. लोकसभेच्या विद्यमान मतदारसंघात सहापैकी चार आमदार पक्षाचे असतांना याठिकाणी खासदारीच्या निवडणुकीत पक्षाचा पराभव का होतो? या ठिकाणी भाजपचा पराभव करण्यासाठी काय खेळी करावी लागणार याबाबत शरद पवार कानमंत्र देणार याकडे जिल्ह्यास राज्याचे लक्ष राहणार आहे.

दुसरीकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघाबाबत राष्ट्रवादीची भूमिका काय राहणार? हा मतदारसंघ मित्र पक्ष असणार्‍या शिवसेना की कॉग्रेसला सोडावयाचा? याच मतदारसंघात पवार यांचे पारंपारीक विरोधक असणार्‍या विखे पाटील कुटूंब याबाबत काय भुमिका घ्यावची याबाबत बैठकीत चर्चा होणार असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नगर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोनही जागेबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वाचे लक्ष राहणार आहे.

सहज संपर्कामुळे नगरला मेळावा

दरम्यान, राष्ट्रवादीच्या मेळाव्याच्या तयारीसाठी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी नगरला हजेरी लावली होती. नगर जिल्हा दळणवळणाच्यादृष्टीने राज्याच्या केंद्रभाग असून आता समृध्दी महामार्गामुळे विदर्भ आणि मराठवाड्याशी सहज संपर्क होत असून पश्चिम महाराष्ट्रातून नगरला सहज येत येते. यामुळेच पक्षाचा मेळावा नगरला ठेवण्याची तयारी असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, मेळाव्याच्या नियोजनाच्या अधिकच्या तयारीसाठी प्रदेशाध्यक्ष आ. पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रत्यत्न केला. मात्र, थेट संपर्क होवू शकला नाही.

राष्ट्रवादीचा नगर जिल्ह्यावर डोळा

भाजपचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नगर जिल्ह्यातील भाजपची जवाबदारी आहे. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे गेल्यापासून फडणवीस यांचे जिल्ह्याकडे कानाडोळा असल्याची चर्चा आहे. मात्र, गेल्या काही वर्षापासून नगर जिल्ह्यावर राष्ट्रवादीचा डोळा असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील छोट्यातील छोट्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हजेरी लावलेली आहे. त्यात आता राष्ट्रवादीचा वर्धापन दिन जून महिन्यांत येत असून त्यापार्श्वभूमीवर नगर शहरात पक्षाचा मेळावा घेण्यात येणार असल्याचे यापूर्वी पक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे. मात्र, हा मेळावानिमित्त असून येणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाला नगर जिल्ह्याकडून मोठ्या अपेक्षा आहे. यामुळेच नगर जिल्ह्यावर पूर्वीपासून राष्ट्रवादीचा डोळा असल्याचे सांगण्यात सुत्रांकडून आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com