साई संस्थान अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून सुरेशराव वाबळे यांच्या नावाची चर्चा

साई संस्थान अध्यक्ष पदासाठी  राष्ट्रवादीकडून सुरेशराव वाबळे यांच्या नावाची चर्चा

राहुरी (प्रतिनिधी) - जागतिक दर्जाच्या शिर्डी येथील साई संस्थानच्या अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून राहुरीच्या सुरेशराव वाबळे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. वाबळे हे सुशिक्षित आहेत, सहकार चळवळीत त्यांचे अनमोल योगदान आहे, शिवाय, त्यांनी साई संस्थानचे विश्वस्त पद भूषविलेले असल्याने त्यांना व्यवस्थापनाचा मोठा अनुभव आहे, आणि महत्वाचे म्हणजे तनपुरे कुटुंबाचे व राष्ट्रवादीचे एक सदस्य म्हणून त्यांची ओळख असल्याने खुद्द शरद पवार, अजित दादा, जयंत पाटील यांची देखील या नावाला पसंती असल्याची माहिती समजली आहे.

सध्या शिर्डीच्या साई संस्थान विश्वस्त निवडीसाठी हालचालींना वेग आला आहे, यात काँग्रेसकडून सत्यजित तांबे यांचे नाव आघाडीवर असताना राष्ट्रवादीकडून सुरेशराव वाबळे यांचे नाव पुढे करण्यात येत असल्याचे समजते. वाबळे हे माजी खा बापूसाहेब तनपुरे यांचे विश्वासू आहेत. तसेच, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे मार्गदर्शक म्हणूनही त्यांना ओळखले जाते. तनपुरे घराण्याचे हितचिंतक असलेले वाबळे यांचे राष्ट्रवादी पक्षासाठी देखील मोठे योगदान आहे. त्यांच्याकडे कोणते मोठे राजकीय पद नसले तरी पडद्याआड किंगमेकर म्हणूनच ते काम करत असतात. त्यामुळेच पक्षाचे नेते शरदचंद्र पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील या प्रमुख नेत्यांसमवेत वाबळे यांची खास ओळख आहे. म्हणूनच, या सर्व नेत्यांनी वाबळे यांच्यावर विश्वास व्यक्त करत त्यांना साई संस्थांनचे विश्वस्त पदी संधी दिली होती. त्यावेळी वाबळे यांनी व्यवस्थापणातील केलेले बदल, साई भक्तांच्या सुविधेसाठी घेतले निर्णय, त्यातून अलर्ट झालेली यंत्रणा, हॉस्पिटल, भक्तनिवास, प्रसादालय, दर्शन रांगा इत्यादी बाबत त्यांनी स्वतः लक्ष केंद्रित करून सुसज्ज व्यवस्थापन केले, त्यांच्या या कार्याचे देश विदेशातून कौतुक झाले, यातून त्यांनी देश विदेशातूनही संस्थानला देणगी वाढवली, त्यांनी अहोरात्र शिर्डीत राहून बाबांची सेवा केली, त्यांच्या कार्याचं पक्षाच्या नेत्यांनीही तोंडभरून कौतुक केले होते.

वाबळे हे कार्यकाळ संपला म्हणून पक्षाला किंवा तनपुरे कुटुंबाला विसरले नाहीत. त्यांनी त्यानंतरही पक्षाचे प्रामाणिक काम केले, या कालावधीत जिल्ह्यात सहकार चळवळ त्यांनी वाढवली, पतसंस्था, मल्टिस्टेट बँक विभागात त्यांनी आपल्या नेतृत्वगुणांनी क्रांती घडवून आणली. आज राज्याचे नेतृत्व करताना त्यांनी मल्टिस्टेट चळवळ सातासमुद्रापार नेली आहे. राज्याचे नेतृत्व वाबळे हे करत असल्याने नगर जिल्ह्यासाठी ती अभिमानाची बाब आहे. त्यांनी सामाजिक कार्यात देखील अनमोल असे योगदान दिले आहे, आपल्या प्रेरणा संस्थेच्या माध्यमातून धार्मिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक कार्यात त्यांनी सदैव हात मोकळे सोडले आहे.

अशा प्रकारे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले वाबळे हे 10 वर्षानंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. लवकरच साई संस्थान विश्वस्त निवड होत आहे. यात अध्यक्ष पदावर राष्ट्रवादीने दावा सांगितला आहे. राष्ट्रवादीकडून येथे अनेक विद्यमान आमदार इच्छुक असले तरी सत्तेचे विकेंद्रीकरण लक्षात घेता ही संधी त्यांना मिळणे अवघड आहे, मात्र अराजकीय व्यक्तीची अटपल लक्षात घेता सुरेशराव वाबळे हे नाव पुढे येताना दिसत आहे. वाबळे हे पक्षाच्या पदावर नाहीत. त्यामुळे त्यांना अध्यक्ष केले तर भविष्यात कायदेशीर डोकेदुखी होणार नाही, ते विश्वासू असल्यामुळे 'आपला माणूस' म्हणून तिथे वर्चस्व देखील राहणार आहे, त्यांच्या वैयक्तिक संबंधामुळे त्यांच्या नावाला फारसा विरोध देखील होणार नाही. एक अनुभवी व अराजकीय माणूस दिल्याने पक्षाला देखील अप्रत्यक्ष फायदाच होणार आहे.

आज कोरोना संकटात वाबळे यांच्यासारखा माणूस तिथं बसवला तर संस्थानची आरोग्य व्यवस्था पुन्हा कात टाकेल, गोरगरिबांना आणखी चांगले उपचार मिळू लागतील, यासह अन्य बदल पहायला मिळू शकतात, यामुळे वाबळे यांचे नाव आघाडीवर असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या नावावर मुंबईत चर्चा झाल्याचेही समजले आहे त्यामुळे साई संस्थानचे अध्यक्ष म्हणून राहुरीला अर्थात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंच्या मतदार संघात वाबळे यांना ही संधी मिळण्याची शक्यता आहे, अर्थात वाबळेंना संधी मिळाली तर ना. तनपुरे यांचे मतदार संघातील प्राबल्य वाढणार आहे.

साई संस्थान राष्ट्रवादीकडेच!

जिल्ह्यात राष्ट्रवादीचे 6 आमदार आहेत, याशिवाय अन्य काही कारणांमुळे साई संस्थानवर आम्ही दावा केला आहे.त्यासाठी वरिष्ठ पातळीवर नेत्यांकडे तशी मागणी केलेली आहे. कोणत्याही परिस्थितीत शिर्डी संस्थान हे राष्ट्रवादीकडे ठेवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे, आणि नक्कीच यात यश मिळणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी व्यक्त केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com