
अकोले(प्रतिनिधी)
आ.डॉ. किरण लहामटे हे पुन्हा आपली भूमिका बदलण्याच्या मनस्थितीत असल्याची चर्चा आहे. त्यांनी काल रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुबंई येथे भेट घेतली. या भेटीनंतर आज पत्रकारांशी बोलतांना आपण पुन्हा एकदा जनतेत जाऊन लोकांची मते अजमावणार आहोत आणि त्यानंतर आपण निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडा नंतर जिल्ह्यातील कोण आमदार कोणत्या गटासोबत अशी चर्चा सुरू असताना अकोले मतदारसंघातील आ. डॉ. किरण लहामटे यांनी अकोल्याच्या जनतेचा कौल मान्य करत शरदचंद्र पवार यांची सिल्व्हर ओकवर बुधवारी भेट घेऊन आपण शरद पवार यांचेसोबतचं राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. आ.डॉ. किरण लहामटे यांच्या या निर्णयामुळे अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडुन अकोले तालुक्यात राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहेत. पण मात्र बहुतांशी अकोलेकर, जुने व नवीन कार्यकर्ते शरदचंद्र पवारांना पाठिंबा देत "पवार साहेब" हाच आमचा पक्ष असल्याचा नारा देताना दिसत आहेत. तर विकासाच्या दृष्टीने काही कार्यकर्त्यांना ते अजित पवार यांच्या गटात जाण्याची इच्छा होती.
अजित दादा पवार यांनी रविवारी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतांना अकोलेचे आ.डॉ. लहामटे हे पहिल्या रांगेत उपस्थित होते,त्यामुळे ते "अजित दादांच्या" सोबत असल्याचे तालुक्यातील जनतेने मनात संभ्रम होता. पण मात्र काही तासातच आ. डॉ किरण लहामटे यांनी "मी जनतेबरोबर"असे सांगत जनता जनार्दन जो निर्णय घेणार तो मला मान्य राहील अशी भुमिका घेतल्याने "जनतेचा कौल शरदचंद्र पवार" असा मिळताच बुधवारी सकाळीच मुंबई मध्ये वाय बी सेंटरमध्ये जाऊन शरद पवार व खा.सुप्रिया सुळे यांची भेट घेत आपण पवार साहेबांबरोबर राहणार असल्याचे जाहीर केले होते.
शुक्रवारी आमदार डॉ.किरण लहामटे सकाळ पासून "नॉट रीचेबल"होते.त्याच दिवशी बारामती व नगर येथून अजित पवार यांचे खास कार्यकर्ते डॉ लहामटे यांना भेटण्यासाठी राजूर येथे आले होते. डॉ लहामटे यांचे मन वळविण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून सुरू असल्याचे त्याच वेळी स्पष्ट झाले. अकोलेत त्यांनी काल पत्रकारांशी बोलताना आई- वडिलांना भेटायला आपण लव्हाळी या आपल्या मूळ गावी गेलो होतो. तेथे रेंज नसल्याने माझा संपर्क होऊ शकला नसेल असे स्पष्ट केले होते. काही तास उलटताच यांनी काल मध्यरात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथील 'देवगिरी' या निवासस्थानी भेट घेतली व त्यांच्याशी तालुक्यातील प्रलंबीत विकास कामे व मंजूर निधी अडकवून ठेवल्या संदर्भात चर्चा झाली. आपण पुन्हा मतदार संघात जाऊन लोकांशी याबाबत चर्चा करू व आपला निर्णय जाहीर करू असे आ डॉ किरण लहामटे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. दरम्यान आज सकाळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याची बातमी वाऱ्यासारखी अकोले तालुक्यात पसरताच पुन्हा उलट सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. यातच स्वतः आ लहामटे यांनी आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटल्याचे सांगत पुन्हा लोकांशी बोलून अंतिम निर्णय घेऊ असे जाहीर केल्याने त्यांच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकेत बद्दल तालुक्यातील जनतेत तीव्र नाराजीची लाट निर्माण झाल्याचे ऐकण्यास व पहावयास मिळत आहे.