‘राष्ट्रवादी’चे कोव्हिड शिक्षण शुल्कनीती अभियान सुरू
सार्वमत

‘राष्ट्रवादी’चे कोव्हिड शिक्षण शुल्कनीती अभियान सुरू

शहरासह जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना निवेदन

Arvind Arkhade

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना महामारीमुळे सर्वसामान्य वर्गाचा आर्थिक प्रश्न गंभीर बनला आहे. अशात काही शाळा, महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्काची पठाणी वसुली करत असल्याचे समोर आले आहे. संकटकाळात शाळा, महाविद्यालये, खाजगी क्लासेस यांनी शुल्क निश्चिती करून विद्यार्थ्यांकडून टप्प्या-टप्प्याने शुल्क मागणीबाबत धोरण ठरविण्याचे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने राज्यभर कोव्हिड शिक्षण शुल्कनीती अभियान सुरू केले असून जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये यांना निवेदन देण्यात आले.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्याध्यापक व प्राचार्यांना याप्रश्नी चर्चा करून विद्यार्थ्यांकडून टप्प्याटप्प्याने शुल्क घेण्याची मागणी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर, जिल्हा कार्याध्यक्ष विशाल म्हस्के, उपाध्यक्ष प्रसाद कर्नावट, नगर तालुका अध्यक्ष गहिनीनाथ दरेकर, अक्षय भिंगारदिवे, गौरव नरवडे, जितेंद्र सरडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आ. संग्राम जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, विद्यार्थी काँग्रेसचे नाशिक विभाग प्रमुख अ‍ॅड. चिन्मय गाढे, प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले.

करोना महामारीचे संक्रमण थांबविण्यासाठी राज्य सरकारने टाळेबंदी केली. या टाळेबंदीत तीन ते चार महिने विविध व्यवसाय, उद्योगधंदे पुर्णत: बंद होते. या काळात अनेकांचा रोजगार बुडाला तर अनेकांना नोकर्‍या गमवाव्या लागल्या. सध्या व्यवसाय, उद्योगधंदे पूर्वपदावर येत असताना नागरिकांपुढे मंदीचे सावट आहे. शाळा, माहाविद्यालये बंद असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे.

मात्र, काही शाळा व महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात अवाजवी शैक्षणिक शुल्क जबरदस्तीने वसूल करतानाचे आढळत आहे. पालकांकडे शैक्षणिक शुल्कासाठी तगादा लावताना दिसत आहेत. सर्वसामान्यांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न असल्याने ते शैक्षणिक शुल्क भरण्यास माघार घेत आहेत. या परिस्थितीमध्ये विद्यार्थी, पालक व शाळांचा समन्वय चांगला राहून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कोव्हिड शिक्षण शुल्कनीती अभियान राबवित असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष भांडवलकर यांनी दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com