भाजपच्या बालेकिल्ल्या राष्ट्रवादीचे विचारमंथन

4 व 5 नोव्हेंबरला शिबिर : राज्यभरातील अडीच हजार पदाधिकार्‍यांची हजेरी
भाजपच्या बालेकिल्ल्या राष्ट्रवादीचे विचारमंथन

अहमदनगर (प्रतिनिधी)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांसाठी राष्ट्रवादी मंथन : वेध भविष्याचा या दोन दिवसीय अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाचे आमदार, खासदार, सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, शहराध्यक्ष, मागील विधानसभा, लोकसभेतील पराभूत उमेदवार असे एकूण अडीच हजार पदाधिकारी या शिबिरात सहभागी होणार आहेत.

विशेष महसूल मंत्री असणारे आणि भाजपचे बडे नेत्यांच्या मतदारसंघात हे राष्ट्रवादीचे विचारमंथन होणार असल्याने राष्ट्रवादीचे नेते यावेळी काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष राहणार आहे.

जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे वर्तमान स्थितीसंदर्भातील आकलन वाढावे, भविष्यातील आव्हानांचा वेध घेण्यासाठी त्यांनी सज्ज व्हावे आणि राष्ट्र तसेच समाजाबद्दलची बांधिलकी भक्कम व्हावी, या उद्देशाने शिबिराचे आयोजन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या राष्ट्रवादी मंथन : वेध भविष्याचाफ या शिबिरामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्यातील विविध क्षेत्रातील विचारवंत, अभ्यासक मार्गदर्शन करणार आहेत. पक्षाच्या वतीने सभासद नोंदणी मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येत आहे. ही मोहीम गतिमान करून ग्रामीण तसेच शहरी भागात कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे निर्माण करण्यात येत असून शिबिराच्या माध्यमातून या मोहिमेला चालना देण्यात येणार आहे.

आज देशापुढे आणि राज्यापुढे अनेक गंभीर प्रश्‍न आहेत. 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना सामोरे जाताना कार्यकर्त्यांची मनोभूमिका अधिक बळकट होण्याची आवश्यकता आहे. केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधकांना दहशतीखाली ठेवण्यात येत आहे. केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने अडीच वर्षे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न झाले. केंद्रीय यंत्रणांची दहशत वापरूनच फोडाफोडी करून महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणण्यात आले.

केंद्रातील सत्ताधार्‍यांच्या कारभारामुळे देशापुढे अनेक प्रश्‍न गंभीर स्वरुपात उभे राहिले आहेत. वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने नांदणा-या या देशातील काही समाज घटकांना सतत भीतीच्या छायेखाली ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत. समाजामध्ये फूट पाडण्याचे तसेच विद्वेष निर्माण करण्याचे काम सत्तेच्या माध्यमातून केले जात आहे. घटनात्मक संस्थांचे खच्चीकरण करण्याची मोहीम राबवली जात आहे. लोकशाही पद्धतीने आवाज उठवणार्‍या विद्यार्थ्यापासून अभ्यासकांपर्यंतच्या विविध घटकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे.

महागाई आकाशाला भिडली असून त्यामुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. शिक्षणापासून सांस्कृतिक क्षेत्रापर्यंत इतिहासाचे विकृतीकरण करून खोटा इतिहास थोपवण्याचे प्रयत्न सत्तेच्या माध्यमातून सुरू आहे. अनेक पातळ्यावरचे अपयश लपवण्यासाठी धार्मिक मुद्द्यांच्या आड लपण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे. या पार्श्‍वभूमीवर विविध प्रश्‍नांसदर्भातील नेमके वास्तव काय आहे, त्यासंदर्भातील नेमकी आव्हाने कोणती आहेत आणि त्यांना सामोरे कसे जाता येईल यासंदर्भातील विचारमंथन शिबिरामध्ये करण्यात येणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com