
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षविरोधी कृती करून भाजपचे उमेदवार माजी आ. शिवाजी कर्डिले यांना मतदान करणारांची फुटीर अशी संभावना राष्ट्रवादीचे नगर जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक अंकुश काकडे यांनी केली आहे. तसेच फुटीरांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, काकडे यांनी या पाचही जणांची स्पष्टपणे नावे घेतलेली नाहीत. पण, ही 5 मते कोणीची गेली, हे आपणा सर्वांना माहिती आहे, त्यामुळे त्यांना तालुक्यामध्ये जाहीरपणे त्याचा जाब विचारा, असे आवाहन त्यांनी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे.
बुधवारी (दि.8) नगर जिल्हा सहकारी बँकेच्या नव्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली. बँकेचे अध्यक्ष अॅड. उदय शेळके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागी निवडणुकीने निवड झाली. राष्ट्रवादीकडून शेवगाव-पाथर्डीचे माजी आ. चंद्रशेखर घुले व भाजपकडून राहुरीचे माजी आ. शिवाजी कर्डिले रिंगणात होते. बँकेच्या संचालक मंडळाच्या 20 सदस्यांपैकी राष्ट्रवादीचे 9, काँग्रेसचे 4 व एक अपक्ष-शिवसेना असे 14 जणांचे संख्याबळ होते तर भाजपकडे तीन जण व विखे समर्थक आणखी 3 मिळून सहा जणांचे संख्याबळ होते.
पण निवडणुकीत मतदान झाले व कर्डिलेंना 10 मते मिळाली तर घुलेंना 9 मते मिळाली. एक मत बाद झाले. त्यामुळे कर्डिलेंनी घुलेंचा एक मताने पराभव करीत बँकेचे अध्यक्षपद पटकावले. या निवडणुकीत बहुमताचे संख्याबळ असतानाही बँकेतील आघाडीत बिघाडी होऊन त्यांची पाच मते फुटली व त्यापैकी चार कर्डिलेंना मिळाली व एक मत जाणीवपूर्वक बाद केले गेले, अशी चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे नगर जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक काकडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे, संबंधित फुटिरांना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारण्याचे आवाहन केले आहे.
माझ्याशी बोलायला हवे होते...
ज्येष्ठ नेते अजित दादा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी या निवडणुकीत सर्व संचालकांची मते आजमावून घेतली आणि त्याप्रमाणे निर्णय घेतला, असे स्पष्ट करून काकडे म्हणाले, हा निर्णय घेत असताना ज्यांनी कोणी मतदान केले नाही, त्यांनी आपली नाराजी किंवा आपले स्पष्ट मत कोणाजवळही व्यक्त केले नाही तसेच उमेदवारीबाबत निर्णय पवार जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांशी चर्चा करून घेतला होता. पवार समोर बोलण्याचे धाडस कोणी केलं नसेल, हे मी समजू शकतो, पण बुधवारी सकाळी मी आलो होतो, त्यावेळी जरी मला नाराजी त्यांनी सांगितली असती तर, मी दादांशी बोलून, दादांनी त्यात काही मार्ग काढला असता, परंतु आपलं स्पष्ट मत सांगण्याचे धाडस न दाखवता, छुप्या पद्धतीने आपली नाराजी व्यक्त केली, हे पक्षाप्रती अतिशय चुकीचे आहे. शिवाय ही निवडणूक 3 वर्षासाठी नव्हती. एक वर्षानंतर आपण पुन्हा बदल करू शकत होतो. त्यामुळे जे कोणी इच्छुक होते, त्यांना पुढची 2 वर्ष ही संधी मिळू शकली असती, परंत ुत्यांनी ती गमावली आणि आता 3 वर्ष तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागणार आहे. आपली वरिष्ठ मंडळी याबाबत जो काय निर्णय घ्यायचा असेल, तो निश्चित घेतील व तो नजीकच्या काळामध्ये आपल्याला पाहायला देखील मिळेल, असेही काकडे यांनी आवर्जून स्पष्ट केले आहे.
लाजिरवाणा पराभव
कार्यकर्त्यांनो फुटीरांना जाब विचारा, असे आवाहन काकडे यांनी केले असून, यासंदर्भातील प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, जिल्हा बँकेचे अध्यक्षपद निवडणुकीत आघाडीचे बहुमत असतानाही आपल्या उमेदवाराचा झालेला पराभव हा अतिशय लाजिरवाणा आहे. हा पराभव कोणामुळे झाला हे छोट्या कार्यकर्त्यापासून वरिष्ठांपर्यंत सर्वांना माहिती आहे. ज्यांनी आपल्या उमेदवाराला मतदान केले नाही, त्यांना त्यांच्या तालुक्यांमध्ये आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेराव घालून जाब विचारला पाहिजे, जेणेकरून म्हातारी मेल्याचे दुःख नाही, परंतु काळ सोकावता काम नये, असे स्पष्ट करून ते म्हणाले, खरं म्हटलं तर नुकत्याच झालेल्या कसबा निवडणूक निकालामुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळूननिघाला होता, आघाडीमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते आणि त्यामध्ये कालचा पराभव हा राज्यावर फार परिणाम करणारा नसला, तरी नगर जिल्ह्यावर मात्र त्याचा निश्चित परिणाम होईल, हे ज्यांनी कोणी मतदान केले नाही, त्यांनी समजून घेतले नाहीव त्याची फळे त्यांना आगामी काळामध्ये भोगावी लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.