नवोदयच्या प्रवेशात जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची बाजी

80 जणांमध्ये 43 झेडपीच्या, तर 37 खासगी शाळांचे विद्यार्थी
नवोदयच्या प्रवेशात जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची बाजी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. एकूण भरायच्या 80 जागांपैकी 43 विद्यार्थी जिल्हा परिषदेचे, तर 37 विद्यार्थी खासगी शाळांचे आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या यशामुळे झेडपीच्या शाळांमधील शिक्षणांच्या गुणवत्ता अधोरेखेतील झाली आहे.

प्रामुख्याने ग्रामीण भागातील हुशार मुलांना त्यांच्या कुटुंबाच्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीचा विचार न करता देशपातळीवरील दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून प्रत्येक जिल्ह्यात सीबीएसई अभ्यासक्रमाचे केंद्रीय नवोदय विद्यालय आहे. या विद्यालयात सहावीसाठी प्रवेश मिळावा म्हणून 30 एप्रिल 2022 रोजी प्रवेश परीक्षा झाली. परीक्षेसाठी जिल्ह्यातून खासगी व जिल्हा परिषदेचे असे एकूण 16 हजार विद्यार्थी बसले होते. शिक्षण विभागाने त्यासाठी जिल्ह्यातील 69 केंद्रांवर परीक्षेची तयारी केली होती. माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, माध्यमिकचे विस्तार अधिकारी आ. एम. पवार आदींनी या परीक्षेसाठी प्रयत्न केल्याने यंदा सर्वाधिक विद्यार्थी परीक्षेसाठी बसले. दरम्यान, निकाल लागल्यानंतर यात सर्वाधिक 43 विद्यार्थ्यांची जिल्हा परिषदेकडून व 37 विद्यार्थी इतर खासगी शाळांमधून नियुक्त झाले.

सौंदाळा शाळेतून 7 विद्यार्थी

जिल्ह्यात सर्वाधिक विद्यार्थी नेवासा तालुक्यातून नवोदयसाठी पात्र ठरलेली आहेत. त्यांची संख्या 10 आहे. त्यात 7 विद्यार्थ्यी एकट्या सौंदाळा जिल्हा परिषद शाळेतील आहेत. याशिवाय अकोल्यातून 9 विद्यार्थी निवडले गेले. त्यातही एकट्या धामणगाव आवारी शाळेचे 6 विद्यार्थी आहेत.

तालुकानिहाय निवडलेले विद्यार्थी कंसात खासगीचे

नेवासा 10 (3), अकोले 9 (2), पारनेर 2 (1), संगमनेर 3 (6), श्रीगोंदा 1 (4), राहाता 4, कोपरगाव 2 (3), राहुरी 2 (4), जामखेड 3 (1), कर्जत 7 (3), शेवगाव 1 (2) नगर 1 (2), पाथर्डी 0 (2) आणि श्रीरामपूर 2 (0) यांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com