अकोले |प्रतिनिधी| Akole

कम्युनिस्ट पक्ष सोडला पण तो विचार सोडला नाही मागील निवडणुकीत भाजप उमेदवाराचा केलेला प्रचार हा केवळ एक अपघात होता,

अशी भावना व्यक्त करतानाच ना. बाळासाहेब थोरात यांचे नेतृत्व यापूर्वीच स्वीकारले, यापुढे काँग्रेस पक्षाच्या व ना. थोरात यांच्या नेतृत्वाखाली अकोले तालुक्यातील प्रलंबित कामे पूर्ण करणे व नवीन कामांना गती देणे तसेच तालुक्याच्या प्रगतीसाठी व संस्थात्मक कामाच्या उभारणीसाठी ना. थोरात यांच्या नेतृत्वाखाली अधिक उत्साहाने काम करू. तालुक्यातील जनतेला काँग्रेस पक्ष आधार वाटेल, असे काम करणार असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले यांनी दिली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात व प्रांतीकचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आम्ही काँग्रेस पक्षात प्रातिनिधिक स्वरूपात प्रवेश केला. त्यानंतर अकोले येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते मिनानाथ पांडे, विद्यार्थी नेते मदन पथवे, रमेशराव जगताप, शिवाजीराव नेहे, आरीफ तांबोळी, विक्रम नवले आदी उपस्थित होते.

मधुकरराव नवले म्हणाले, डाव्या चळवळीचा आम्ही पुरस्कर्ते राहिलो असून आमच्यावर असलेला विचारांचा पगडा व काँग्रेस पक्षाची चळवळ, संस्कृती यांच्या विचाराने आम्ही प्रवेश केला आहे. या पुढे काँग्रेस संघटन बळकट करणे, हाच एकमेव उद्देश असून आता स्वगृही आल्याचा आनंद मिळत आहे.

भाजप विचारसरणी ही कधीही मान्य नव्हती, परंतु राजकारणात काही वळणे अनिश्चितपणे घ्यावी लागली. आता मात्र भाजपला विरोध हेच एकमेव समाजकार्य करावयाचे आहे. कारण भाजपमुळे ग्रामीण भाग, शेतकरी उद्ध्वस्त झाला असून युवक बेरोजगार झाले आहेत. देशाला भवितव्यच राहिले नाही. भांडवलीशाही प्रत्येक क्षेत्रात येत असल्याने पूर्वीच्या ईस्ट इंडिया कंपनी प्रमाणे मोठे उद्योजक सर्व क्षेत्र काबीज करण्याचा डाव आखीत आहे. त्यामुळे भारत देश पुन्हा पारतंत्र्यात जातो की काय, अशी शंका येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना आम्हाला विचारात घेतले नव्हते, विचारले असता तो पर्यंत त्यांचा निर्णय झाला होता. त्यामुळे व्यक्ती प्रेमापोटी आम्ही भाजपबरोबर गेलो, मात्र आता भाजपच्या विरोधात काम करणे हेच आता आमचे समाजकार्य असणार असल्याचे नवले यांनी सांगितले.

मदन पथवे म्हणाले, माझ्या आजोबापासून माझ्यावर डाव्या विचार सरणीचा पगडा आहे. काँग्रेस संस्कृती जवळची वाटली म्हणून हा निर्णय घेतला. राष्ट्रवादी पक्षात सध्या विचारांचे राजकारण होत नसून त्यांच्याकडे कोणतीही दिशा नाही.

नगरपंचायत निवडणूक आघाडीचा धर्म पाळून लढविणार, मात्र पूर्व तयारी म्हणून स्वबळावर लढण्याची तयारी ठेवून सर्व 17 प्रभागात उमेदवार देणार आहोत. काँग्रेस संघटनेच्या चौकटीत काम करणार आहोत, सर्वांनी दिलेली जबाबदारी पार पाडावीत. नेतृत्व हा विषय नसून सर्वजण एकदिलाने कोणताही वाद निर्माण होणार नाही हे ठरवून घेऊनच काम करणार आहोत.
- मधुकरराव नवले, ज्येष्ठ नेते, काँग्रेस.

काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडविणार आहोत, त्यामध्ये निळवंडेच्या कालव्याचे प्रश्न, बिताका प्रकल्प पूर्ण करणे, देवठाण रस्त्याचे काम पूर्ण करणे, 32 गाव पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणे, तहसील कार्यालयाचे काम पूर्ण करणे, उपजिल्हा रुग्णालय मान्यता आणणे इ. कामे पूर्ण करावयाची आहेत. सध्याचे लोकप्रतिनिधी या कामांना प्राधान्य देताना दिसत नाही, प्रसंगी त्यांना निमंत्रित करून ही कामे मार्गी लावू, अन्यथा ना. थोरात यांच्या माध्यमातून हे प्रश्न सोडविणार आहोत.
- मिनानाथ पांडे, ज्येष्ठ नेते, काँग्रेस.