
नाऊर |वार्ताहर| Naur
श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव - नाऊर रस्त्यावरून कांदा लागवडीसाठी महिला मजूर घेऊन सुसाट वेगाने चाललेल्या टाटा झीप या चारचाकी वाहनाने मोटारसायकलवर श्रीरामपूरकडे चाललेल्या बाप-लेकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीवर असलेल्या नाऊर येथील शरद सोपान देसाई व त्यांची गर्भवती मुलगी सोनाली हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर श्रीरामपूर येथील साखर कामगार हॉस्पिटल येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
शिरसगाव येथील टाटा झीप (क्र. एमएच 17 बीवाय 0561) चा चालक कांदा लागवड करण्यासाठी महिला घेऊन वेगाने जात असताना पुढे आलेल्या वळणावर गाडीचा ताबा सुटल्यामुळे समोरून मोटारसायकलवर येणारे नाऊर येथील शरद सोपान देसाई व त्यांची गर्भवती मुलगी सोनाली यांना जोराची धडक दिली. धडकेनंतर हे चार चाकी वाहन मजुरीच्या महिलांसह पलटी झाले व सुमारे दहा ते पंधरा फूट फरफटत गेले. त्यामुळे रिक्षात बसलेल्या महिलाही जखमी झाल्या.
घटनेची माहिती मिळताच नाऊर येथील नागरिक तातडीने घटनास्थळी धावले. अपघातातील जखमी शरद देसाई व त्यांच्या मुलीला तसेच वाहनातील जखमी महिलांना साखर कामगार हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. शरद देसाई यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना डोक्याला सुमारे 18 टाके पडले असल्याने अति दक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर चालक टाटा झीप वाहनासह तेथून पसार झाला. दरम्यान, चारचाकी वाहन चालक हा स्वत:ची साईड सोडून उजव्या बाजूने जास्त प्रमाणात वाहन घेतल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून समजते. हे वाहन रस्त्याच्या उजव्या बाजूला पलटी झाल्याचेही दिसून येत आहे.