नाऊर बंधार्‍याच्या प्लेट चोरण्याचा पुन्हा प्रयत्न

ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे गाडीसह 3 जण पोलिसांच्या ताब्यात
नाऊर बंधार्‍याच्या प्लेट चोरण्याचा पुन्हा प्रयत्न

नाऊर |वार्ताहर| Naur

श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील गोदावरी पात्रांमध्ये असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍याच्या निकामी सुमारे 22 फळ्या चोरून नेण्याचा प्रयत्न जागरुक नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला. नागरिकांनी या फळ्या चोरून नेणार्‍या वाहनाचा सुमारे 10 ते 11 कि. मी. पाठलाग करून सदर वाहन अडविले व चोरट्यांना चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले.

नाऊर येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍याच्या फळ्या रात्री 1 ते 2 च्या सुमारास चोरट्यांनी चोरून घेऊन जात असता काही सतर्क नागरिकांनी पाहिले. चोरट्यांच्या ताब्यात असलेले वाहन क्रं. एम. एच.12 क्यू. डब्लू. 7271 थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र सदर चोरट्यांनी अशोक लेलंड कंपनीची हे वाहन वेगाने पळवल्याने ग्रामस्थांना शंका आली. सदर गाडीचा मोटरसायकल वरून पाठलाग करून उंदिरगाव भागात असलेल्या काही नागरिकांना या घटनेची कल्पना दिली. सुमारे 10 ते 11 कि.मी. पाठलाग करत संबधित वाहन पकडून चोरट्यांना चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.

दरम्यान यापूर्वी देखील तीन वेळेस येथील बंधार्‍यांच्या लोखंडी फळ्याची चोरी झाली असून आरोपींना देखील अटक करण्यात आली होती. सातत्याने याच बंधार्‍याच्या फळ्या चोरी जात असून या बंधार्‍या लगत पूर्वी असलेली इमारत पुन्हा बांधली तर बर्‍याच अंशी चोर्‍या थांबण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली.

याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 173/2022 कलम 379,511,34 प्रमाणे शासकीय लोखंडी प्लेटची चोरी केली म्हणून कैलास भागवतराव बोर्डे यांच्या फिर्यादीवरून आरोपी इलिहास मेहमुद शेख (वय 24) रा. बिफ मार्केट जवळ, वार्ड नं.2. श्रीरामपूर, महेश सुनिल साठे (वय 24) 1 वाडी हरेगाव , आनंदा बाळू साळवे (वय 33) ए ब्लॉकवाडी हरेगाव ता. श्रीरामपूर यांना अटक केली आहे. त्यांच्या बरोबरचे इतर 3 साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. पुढील तपास डी.वाय.एस.पी. संदीप मिटके व पोलिस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल सतिश गोरे व पोलिस नाईक दादासाहेब लोंढे हे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com