पावसामुळे नैसर्गिक हानी, दिवाळीच्या खरेदीवर परिणाम, व्यापार्‍यांना मोठा फटका

पावसामुळे नैसर्गिक हानी, दिवाळीच्या खरेदीवर परिणाम, व्यापार्‍यांना मोठा फटका

अकोले |प्रतिनिधी| Akole

सप्टेंबर अखेरीस संपणारा पाऊस यावर्षी दिवाळीतही सुरूच आहे. त्यामुळे शेतकरी व मजूर वर्गाचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. नैसर्गिक हानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. वातावरणातील विषमतेमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे अकोलेच्या बाजारपेठेत दिवाळी सणाचा फारसा उत्साह दिसत नाही.

यंदा शेतकरी, मजूर, सर्वसामान्य नागरिक दिवाळी सणानिमित्त जीवनावश्यक वस्तूंचा अपवाद वगळता अन्य गोष्टींवर अनावश्यक खर्च करत नसल्याचे पहावयास मिळत आहे. त्याचा फटका कापड व्यवसायिकांना बसला आहे. फटाक्याच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे त्याकडे ही ग्राहक पाठ फिरवताना दिसत आहेत. लहान मुलांचे लाड पुरविण्या इतकेच फटाके, कपडे लोक खरेदी करत आहे. परतीच्या पावसामुळे प्रवरा, आढळा, मुळा परिसरासह आदिवासी भागातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. धुव्वाधार पाऊसामुळे ओढया, नाल्यांचे पाणी प्रवरा नदीला मिळाले असल्याने प्रवरा-आढळा-मुळा नद्या दुथडी भरून वाहत आहे.

सततच्या मुसळधार पावसामुळे शहरासह तालुक्यातील सर्वच रस्त्यांची दयनीय स्थिती झाली आहे. ऊसाच्या फडामध्ये पाणीच पाणी असल्याने यंदा ‘अगस्ती’कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ होऊनही ऊसतोड करणे अजून दोन महिने तरी शक्य होणार नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सुरुवातीला मोठ्या उत्साहात असलेले नवनिर्वाचित संचालक मंडळ आता या अवकाळी पावसाने चिंताग्रस्त दिसत आहे. गरीब व शेतकरी वर्गाची दिवाळी ही फक्त किराणा दुकानापुरती मर्यादित राहिल्याचे दिसून येत आहे.

अमृतसागर दूध संघाने दिलेल्या 2 रुपये रिबेट मुळे दूध उत्पादकांची दिवाळी थोडी फार आनंदात जाईल असे वाटत होते. मात्र वाढत्या महागाई मुळे यावर्षी नेहमी सारखा दिवाळी सणाचा उत्साह दिसत नसल्याचे चित्र आहे.परिणामी छोट्या-मोठ्या व्यवसायिक वर्गांत नाराजीची भावना जाणवत आहे.ऐन दिवाळी मध्ये पतसंस्था मधील ठेवी वाढत असतात आता मात्र ठेवी वर लोक कर्ज काढताना दिसत आहे. हे चित्र पहिल्यांदा पाहायला मिळत आहे.पावसाचे प्रमाण खूप जास्त असल्याने शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

सोयाबीन, ऊस, कांदा, अन्य भाजीपाला या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी, कार्यकर्ते ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शासनाकडे करत आहे. वातावरणातील विषमतेमुळे अबाल वृद्धांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. एकंदरीतच यावर्षीची दिवाळीने सर्वांनाच मेटाकुटीस आणल्याचे विदारक चित्र अकोले तालुक्यात पहावयास मिळत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com