देशव्यापी संपासाठी नगरमध्ये सर्व कामगार एकवटणार

आज शहीद भगतसिंह यांच्या पुतळ्यासमोर एकत्र येण्याचे आवाहन
देशव्यापी संपासाठी नगरमध्ये सर्व कामगार एकवटणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केंद्र सरकारने कामगारांचे 44 कायदे मोडित काढून, नव्याने रूपांतर केलेल्या चार कोड बील रद्द करण्याच्या मागणीसाठी देशातील प्रमुख व विविध क्षेत्रातील कामगार संघटनांनी आज सोमवार, 28 मार्च व उद्या मंगळवार, 29 मार्च रोजी संप पुकारला आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरातही सर्व कामगार एकवटणार आहे. अहमदनगर जिल्हा आयटक व लालबावटा विडी कामगार युनियन संयुक्त कृती समितीच्यावतीने आज देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार चौक येथील शहीद भगतसिंह यांच्या पुतळ्यासमोर सकाळी 10 वाजता एकत्र येण्याचे आवाहन आयटकचे जिल्हा सचिव अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर, महाराष्ट्र राज्य विडी फेडरेशनचे राज्य अध्यक्ष कॉ. कारभारी उगले, विडी कामगार युनियनच्या उपाध्यक्ष कॉ. भारती न्यालपेल्ली, अ‍ॅड. कॉ. सुभाष लांडे आदींनी केले आहे.

या आंदोलनात लालबावटा विडी कामगार युनियन, आयटक कामगार संघटना, इंटक विडी कामगार संघटना, आशा व गटप्रवर्तक संघटना, लालबावटा जनरल कामगार युनियन, घरेलू मोलकरीण व घरगडी संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, पतसंस्था कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य पतसंस्था कर्मचारी संघटना सहभागी होणार असून, यामध्ये इतर कामगार संघटनांनी सहभाग नोंदविण्याचे सांगण्यात आले आहे. कामगारांना अडचणीत आणणारे व रोजगार बंद पाडणारे चार श्रम कोड कायदे त्वरित रद्द करावे, दरमहा निवृत्त पेन्शन धारकांना कमीत कमी पाच हजार रुपये पेन्शन मिळावी, विडी कामगारांसाठी गॅस सबसिडी त्वरीत सुरू करावी, खाद्यतेलाचे भाव कमी करून महागाई नियंत्रणात आणावी, विडी कामगारांची बाराशे ते पंधराशे रुपये एवढी कमी असलेली मजुरी रोख स्वरूपात द्यावी, आदी मागणीसाठी निदर्शने व धरणे आंदोलन केले जाणार आहे.

Related Stories

No stories found.