संगमनेर |वार्ताहर| Sangmner

पहिल्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत देशात सर्वाधीक सहभाग नोंदविणार्या महाराष्ट्र संघाने राष्ट्रीय स्पर्धेतही यशाची पताका फडकाविली आहे.

गेले चार दिवस ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने 24 गुणांसह तीन सुवर्ण आणि तीन रौप्य पदकांची कमाई करीत संपूर्ण स्पर्धेवर राज्याची छाप सोडली. तामीळनाडूच्या संघाने प्रत्येकी एक सुवर्ण आणि रौप्य पदकासह दुसरे तर कर्नाटक आणि गुजरातच्या संघाने प्रत्येकी एक सुवर्ण आणि एक कांस्य पदक पटकावित संयुक्तपणे तिसरा क्रमांक पटकाविला.

राष्ट्रीय योगासन स्पोर्टस् फेडरेशनने गेल्या 24 ते 27 मार्चदरम्यान ऑनलाईनफ पद्धतीने राष्ट्रीय योगासन स्पर्धेचे आयोजन केले होते. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये क्रिडा मंत्रालयाने योगासनांना खेळाचा दर्जा दिल्यानंतर पहिल्यांदाच या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सहा गटांमध्ये घेण्यात आलेल्या योगासनांच्या विविध प्रकारांमध्ये त्रिपूरा राज्य व मध्यप्रदेशच्या संघाने प्रत्येकी एक रौप्य, पश्चिम बंगालच्या संघाने दोन कांस्य, तर हरियाणा व तेलंगणा येथील संघाने प्रत्येकी एका कांस्य पदकाची कमाई केली. ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या या पहिल्याच स्पर्धेला देशभरातील विविध राज्यांच्या संघांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

योगासनांच्या विविध कठीण मुद्रा सादर करीत मुलांच्या लहानगटात महाराष्ट्राच्या संघातील प्रीत निलेश बोरकरने 74.33 गुणांसह सुवर्णपदक पटकावित महाराष्ट्राच्या यशाचा झेंडा फडकाविला. त्रिपूराच्या रेहान आलम याने 73.08 गुणांसह रौप्य, हरियाणाच्या दिपांशूने 72.50 गुणांसह कांस्य पदक पटकाविले. याच वयोटातील मुलींमध्ये तामीळनाडूच्या नव्व्या सत्या हरिश हिने 81.92 गुणांसह सुवर्ण, महाराष्ट्राच्या तृप्ती रमेश डोंगरेने 81.75 गुणांसह रौप्य तर पश्चिम बंगालच्या सावली गांगुली हिने 80.58 गुणांसह कांस्य पदक मिळविले.

मुलांच्या मध्यमगटातही महाराष्ट्र संघाचीच छाप दिसून आली. या गटात नितीन तानाजी पवळे याने 79.07 गुण मिळवितांना सुवर्णपदक आपल्या नावे केले. त्यापाठोपाठ जय संदीप कालेकर याने 78.48 गुण मिळवतांना रौप्य तर कर्नाटकच्या आदित्य प्रकाश जंगम याने 77.93 गुणांसह कांस्य पदकाची कमाई केली. याच गटात महाराष्ट्राच्या ओम महेश राजभर याने 77.75 गुणांसह चौथे मानांकन मिळविले. मुलींच्या गटातही महाराष्ट्राने जोरदार मुसंडी मारतांना मृणाली मोहन बाणाईतने 81.58 गुण प्राप्त करीत सुवर्ण पदक तर सेजल सुनील सुतार हिने 81.17 गुणांसह रौप्यपदक पटकाविले. तेलंगणाच्या विरपा रेड्डी लिथीका हिने 80.17 गुणांसह कांस्य पदकाची कमाई केली तर महाराष्ट्राच्या तन्वी भूषण रेडिजने 79.67 गुणांसह पाचवे मानांकन मिळविले.

मुलांच्या मोठ्या गटात कर्नाटकच्या मोहंमद फिरोज शेख याने 79.17 गुणांसह सुवर्ण, तामीळनाडूच्या पी.जीवनाथनने 76.83 गुणांसह रौप्य तर गुजरातच्या प्रतिक बालूभाई मेवाडा याने 75.42 गुणांसह कांस्य पदक मिळविले. याच वयोगटातील मुलींमध्ये गुजरातच्या पूजाबेन घनश्यामभाई पटेल हिने 78.18 गुणांसह सुवर्ण, मध्यप्रदेशच्या सपना छोटेलाल पाल हिने 75.73 गुणांसह रौप्य तर पश्चिम बंगालच्या अनन्या बिश्वास हिने 72.49 गुणांसह कांस्यपदक पटकाविले. या गटात महाराष्ट्राच्या क्षितीज सुहास पाटील याने 70.01 गुण मिळवून चौथे मानांकन मिळविले.

राष्ट्रीय पातळीवर इतक्या व्यापक प्रमाणात ऑनलाईन पद्धतीने बहुधा पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या या स्पर्धेत देशभरातील 5 हजार 328 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यातील 498 स्पर्धक राज्यांचे प्रतिनिधीत्व करत राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले. विजेत्या स्पर्धकांना स्पोर्टस् अॅथोरिटी ऑफ इंडियाचे डायरेक्टर जनरल संदीप प्रधान यांच्या उपस्थितीत महासंघाचे अध्यक्ष डॉ.ईश्वर बसवरेड्डी व महासचिव डॉ. जयदीप आर्य यांच्या हस्ते पारितोषिके दिली गेली. देशभरातील 75 पंचांनी स्पर्धेचे परीक्षण केले.