राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत नगरच्या गदईकडे महाराष्ट्र संघाचे नेतृत्व

69 व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर
राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत नगरच्या गदईकडे महाराष्ट्र संघाचे नेतृत्व

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

हरियाणा चरखी येथे 21 ते 24 जुलै 2022 या कालावधीत होणार्‍या 69 व्या वरिष्ठ पुरुष गट कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राने रविवारी अंतिम संघ जाहीर केला. राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत पहिल्यांदाच विजेतेपद मिळविणार्‍या नगर संघाचा संघनायक शंकर गदई याच्या गळ्यात पहिल्याच वर्षी महाराष्ट्र संघाच्या नेतृत्वपदाची माळ पडली.

या संघात नगर, मुंबई शहर, ठाणे या तीन जिल्ह्यांचे दोन-दोन खेळाडू असून मुंबई उपनगर, नाशिक, रत्नागिरी, नांदेड, रायगड, धुळे यांचा एक-एक खेळाडू आहे. रायगडच्या मयूर कदमकडे गतवर्षाच्या एका राष्ट्रीय स्पर्धेचा अनुभव पाठीशी आहे. इतर 11 खेळाडू अगदी नवखे आहेत. प्रशिक्षक प्रशांत चव्हाण याला 20 वर्षांपेक्षा अधिक काळ कबड्डी खेळाचा अनुभव आहे. उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ख्याती होती. चव्हाण यांच कबड्डी या खेळातील अनुभवाचा प्रशिक्षक म्हणून कसा उपयोग करून घेतो आणि हे नवोदित खेळाडू त्याला कशा प्रकारे सहकार्य करतात यावर महाराष्ट्राचे भवितव्य अवलंबून आहे.

हा निवडण्यात आलेला संघ नगर येथे मॅटवर सराव करीत आहेत. हा निवडण्यात आलेला संघ मंगळवार (दि.19) रोजी दुपारी मुंबईतून रेल्वेने स्पर्धेकसाठी रवाना होणार असल्याची माहिती राज्य संघटनेचे सचिव आस्वाद पाटील यांनी दिली. महाराष्ट्राचा निवडण्यात आलेला संघात- पुरुष वरिष्ठ गट संघ- शंकर गदई संघनायक, राहुल खाटीक (दोन्ही नगर), अक्षय उगाडे, सिद्धेश पिंगळे (दोन्ही मुंबई शहर), अक्रम शेख (मुंबई उपनगर), अस्लम इनामदार, अक्षय भोईर (दोन्ही ठाणे), आकाश शिंदे (नाशिक), शेखर तटकरे (रत्नागिरी), किरण मगर (नांदेड), मयूर कदम (रायगड), देवेंद्र कदम (धुळे) यांचा समावेश आहे. तर प्रशिक्षक म्हणून प्रशांत चव्हाण (ठाणे), व्यस्थापक आयुब पठाण (नांदेड) आणि फिजिओ ट्रेनर म्हणून पुरुषोत्तम प्रभू यांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com