राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

पाथर्डीचे भांडकर यांनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट
File Photo
File Photo

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पाथर्डी तालुक्यातून जाणार्‍या व अनेक वर्षापासून रखडलेल्या कल्याण- विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी पाथर्डीतील उद्योजक डॉ. बंडू भांडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने सबंधित अधिकार्‍यांना आदेश देत पुढील आठवड्यात याबाबत विशेष बैठक लावण्याचे आदेश दिले.

कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे काम आठ ते दहा वर्षापासून संथ गतीने व निकृष्टपणे सुरू आहे.नगर तालुक्यातील चांदबीबी महाल ते पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळी गावापर्यंत पूर्ण पुणे खड्डेमय रस्ता झाल्याने याचा सर्वाधिक त्रास पाथर्डी तालुका व परिसरातील वाहनधारकांना होत आहे. तसेच या महामार्गावर असणार्‍या बीड सह हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील वाहनधारकांना देखील त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी हिंगोलीचे शिंदे सेना गटाचे खा. हेमंत पाटील यांनी व पाथर्डीतील डॉ. भांडकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन दिले.

या निवदेनात म्हटले, महामार्गाचे गेल्या अनेक वर्षापासून अर्धवट अवस्थेत असलेले निकृष्ट दर्जाचे काम व त्यावरील खड्डे यामुळे शेकडो अपघात सुमारे चारशे वाहनधारकांचा व प्रवाशांचा विनाकारण बळी गेला आहे. तसेच दीड हजाराच्या आसपास प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. यामुळे वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यासाठी सर्वच पक्षांनी वेळोवेळी शेकडो निवेदने देत रास्ता रोको आंदोलन, सत्याग्रहसह प्रसंगी कार्यालयाची तोडफोड देखील केली आहे.

मात्र, याचा परिणाम संबंधित विभागावर झालेला नाही. कागदी घोडे नाचवत वाहनधारकांच्या समाधानासाठी काही वेळा ठेकेदार बदलले, मात्र कामाबाबत अद्याप कुठलीही प्रगती झालेला नाही. तसेच याचा पाथर्डी तालुक्याच्या विकास व प्रगतीसाठी वरदान ठरणारा महामार्ग कुचकामी ठरत आहे. यामुळे वाहनधारकांनी या महामार्गावरून प्रवास करण्याकडे पाठ फिरवल्याने तालुका व परिसराची बाजारपेठ उध्वस्त झाली असल्याचे निवदेनात स्पष्ट करण्यात आले आहे.

मागील सोमवारीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राष्ट्रीय महामार्गाच्या समस्या संदर्भात निवेदन दिले आहे. मात्र बैठक होईपर्यंत याबाबत प्रसिद्धी करण्याचा विचार नसल्याने माध्यमांना माहिती दिली नव्हती. लवकरच मंत्रालयात बैठक झाल्यानंतर या महामार्गाची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे डॉ. भांडकर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com