
कोल्हापूर | Kolhapur
राष्ट्रीय पंचायत राज दिनाचे (Rashtriya Panchayat Raj Din) औचित्य साधत केंद्र सरकारने (Central Govt) राष्ट्रीय पंचायत पुरस्कार (National Panchayat Award) जाहीर केले आहे. यात दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार २०२२ अंतर्गत उत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कारात कोल्हापूर जिल्हा परिषद (Kolhapur ZP) अव्वल ठरली असल्याची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushriif) यांनी माहिती दिली. कोल्हापूर जिल्हा परिषदेला ५० लाख रुपये पुरस्काराची रक्कम मिळणार असून, ग्रामपंचायतीच्या खात्यात थेट हस्तांतरित करण्यात येणार असल्याचाही माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली.
याचबरोबर राहाता (जि. अहमदनगर) आणि मालवण (जि. सिंधुदुर्ग) पंचायत समित्यांची निवड करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. यात १७ ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये बालसुलभ ग्रामपंचायत पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील श्रृंगारवाडी ग्रामपंचायतीस आणि ग्राम पंचायत विकास आराखडा पुरस्कार अहमदनगरच्या लोहगाव या ग्रामपंचायतीला मिळाला. तसेच नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार हा राज्यातून उस्मानाबाद जिल्ह्यातील भंडारवाडी या ग्रामपंचायतीला मिळाला असल्याचेही त्यांनी सांगितले.
पंचायत राज दिनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी हे कोणत्याही एका ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेला हजर राहून पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतीच्या कार्यास प्रोत्साहन देणार आहेत. राज्यातील इतर ग्रामपंचायतींनीही यावर्षीचे पुरस्कार मिळविण्याच्या दृष्टीने विविध योजना, उपक्रमांची आपल्या कार्यक्षेत्रात यशस्वी अंमलबजावणी करुन आदर्श कामगिरी करावी, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले आहे.
...अशी मिळणार रक्कम
राहाता (जि. अहमदनगर) आणि मालवण (जि. सिंधुदुर्ग) या पंचायत समित्यांना प्रत्येकी २५ लाख रुपये आणि १७ ग्रामपंचायतींना लोकसंख्येप्रमाणे ५ ते १५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम पुरस्कार स्वरुपात थेट खात्यात जमा होणार आहे. श्रृंगारवाडी आणि लोहगाव ग्रामपंचायतीस प्रत्येकी ५ लाख रूपये त्याचप्रमाणे नानाजी देशमुख राष्ट्रीय ग्रामसभा गौरव पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीस १० लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे.