नाशिक पथकाचे लॉटरी, बिंगो जुगारावर छापे

कोतवाली हद्दीत कारवाई || 15 जणांविरूध्द गुन्हा
File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या पथकाने अहमदनगर शहरात विनापरवाना सुरू असलेल्या लॉटरी व बिंगो जुगार अड्ड्यांवर कारवाई केली. वाडिया पार्कसमोरील झेरॉक्स लाईनच्या गाळ्यांमध्ये हा धंदा सुरू होता. पथकाने सोमवारी रात्री छापेमारी करत ही कारवाई केली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात एकुण 15 जणांविरूध्द तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

विशेष महानिरीक्षक डॉ. शेखर पाटील यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक बापु रोहोम यांना वाडीया पार्क परिसरात जुगार अड्डे सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने कारवाई करत जुगाराचे साहित्य, मोबाईल आणि रोख रक्कम असा एक लाख 40 हजार 440 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ज्ञानेश्वर वसंतराव तनपुरे (वय 48 रा. तपोवन रस्ता, सावेडी), संतोष गुलाबचंद गोयल (वय 42 रा. जुना महानगरपालिकेजवळ), नीलेश कृष्णा लोखंडे (वय 29 रा. केडगाव), आनंद लोढा (रा. कोपरगाव), पंडीत पोकळे (रा. कडा ता. आष्टी, जि. बीड) हे ऑनलाईन लॉटरी जुगार विनापरवाना खेळवत होते. तर त्याठिकाणी शाम बालु आडागळे (वय 23 रा. संजयनगर, काटवन खंडोबा मंदिराजवळ), विजय लक्ष्मण शिंदे (वय 32 रा. नारायणडोह ता. नगर), विकास दिलीप भिंगारदिवे (वय 33 रा. काटवन खंडोबा रस्ता), यासीन रज्जाक शेख (वय 50 रा. केडगाव), अशोक दामोदर कावळे (वय 36 रा. केडगाव), रामभाऊ सदाशिव घुले (वय 29 रा. दरेवाडी ता. नगर), प्रविण अनिल टेकाळे (वय 24 रा. शिवाजीनगर), बाबा महेबुब शेख (वय 41 रा. बुरूडगाव रस्ता) आणि प्रकाश बबन गायकवाड (वय 54 रा. बोल्हेगाव फाटा) हे पैसे लावून जुगार खेळत होते.

राकेश बालराज गुंंडू (वय 31 रा. शिवाजीनगर) व महेंद्र माखिजा (रा. अहमदनगर) हे त्यांच्या साथीदारांच्या मदतीने मोबाईलद्वारे बिंगो जुगार खेळत होते. यांच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष पथकातील पोलीस निरीक्षक रोहोम, सहायक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, पोलीस अंमलदार शकील शेख, सचिन धारणकर, कुणाल मराठे, प्रमोद मंडलीक यांनी ही कारवाई केली.

विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शेखर पाटील यांनी अवैध धंद्याविरोधात कारवाई करण्यासाठी एक विशेष पथक स्थापन केले आहे. त्यांनी अहमदनगर शहरात सुरू असलेल्या लॉटरी, बिंगो जुगारावर छापेमारी केली. शहरात मोठ्या प्रमाणात बिंगो, तिरट जुगार, क्लब सुरू आहे. स्थानिक पोलिसांना याची माहिती देखील आहे. परंतू त्यांच्याकडून यावर कारवाई केली जात नव्हती. शेवटी विशेष पथकाने छापेमारी केल्याने नगर पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com