नाशिक -पुणे रेल्वेमार्गासाठी भूसंपादन अधिकारी नियुक्त होणार

महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रस्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशनने जिल्हाधिकार्‍यांकडे मागवली माहिती
नाशिक -पुणे रेल्वेमार्गासाठी भूसंपादन अधिकारी नियुक्त होणार

संगमनेर|Sangmner

नासिक, अहमदनगर, पुणे जिल्ह्याला जोडणार्‍या भारतीय रेल्वे मार्गाची अनेक वर्षाच्या मागणीला यश मिळत असून केंद्र सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. राज्य शासनाच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत हा प्रस्ताव आहे. याकरिता लागणारी जमीन संपादन करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू झाली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशनने अहमदनगर जिल्हाधिकारी यांना पत्र लिहिले असून माहिती मागवली आहे.

भारतीय रेल्वेच्या महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन पुणे ते नाशिक रेल्वे मार्गाच्या विविध तालुक्यातून जाणार्‍या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण अंतिम केले आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यातील गावांची यादी निश्चित करण्यात आली आहे. त्या गावातील किती क्षेत्र या रेल्वेमार्गासाठी संपादित केले जाणार आहेत याची माहितीही कार्पोशनच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेली आहे. संबंधित क्षेत्र संपादन करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी भूसंपादन अधिकारी नियुक्त करावा व त्याची माहिती कार्पोरेशनला कळविण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एकूण 26 गावांचा समावेश या मार्गावरती होणार आहे. कोळेवाडीपासून सायखिंडीपर्यंत गावांचा समावेश आहे. यात पुढील गावातील क्षेत्र संपादित करण्यात येणार आहेत. कोळेवाडी 0.856 किमी, मारवाडी 2.005 किमी, बोटा 3.7 756, येलकोवाडी 2.2, अकलापूर 2.619, खंदरमाळ 2.129, नांदुर खंदरमाळ 2.798, जांबूत 2.68, साकुर 5.806, बांबळेवाडी 3.5886, कुंभारवाडी 2.264, पिंपळगाव देपा 0.9 68, आंभोरे 3.616, कोळवाडी 2.4775, जाखोरी 2.405, खराडी 1.2427, कोल्हेवाडी 2.139, वाघापुर 2.6 716, खानापूर 1.482, सुकेवाडी 1.47, घुलेवाडी 2.1179, मालदाड 1.623, गुंजाळवाडी 1.1244, वेल्हाळे 1.8 815, सायखिंडी 4.173 किलोमीटरक्षेत्र संपादित करण्यात येणार आहे.

या मार्गासाठी हवेली तालुक्यातील 11 गावे, खेड तालुक्यातील 18 गावे, आंबेगावमधील नऊ गावे, जुन्नर तालुक्यातील दहा गावे, सिन्नर तालुक्यातील 17 गावे, नाशिक तालुक्यातील सहा गावे असा समावेश असणार आहे.

नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचे स्वप्न अनेक दिवसाचे आहे. सुमारे 200 किलोमीटर अंतर या रेल्वे मार्गसाठी असणार आहे. यात नाशिक पुणे- नगर तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. सदरचे काम सुरू झाल्यानंतर अवघ्या बाराशे दिवसात पूर्ण होणार आहेत. या मार्गावर धावणारी रेल्वे गाडी ताशी दोनशे ते अडीचशे किलोमीटर वेगाने धावू शकणार आहेत.

भारत सरकारच्या रेल्वेमंत्रालयाअंतर्गत रेल्वे बोर्ड यांनी पुणे -नाशिक दरम्यान दुहेरी मध्यम उच्च वेगवान लाईन विद्युतीकरणाचे बांधकामाकरिता तत्वतः मान्यता दिली आहे. त्यानुसार केंद्रीय सरकारने सक्षम प्राधिकरण म्हणून नियुक्त विशेष भू संपादन अधिकारी यांची माहिती मागितली आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी तात्काळ नाव कळवायचे आहेत. त्या बाबत कार्पोरेशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना पत्र देण्यात आले आहे.

नाशिक- पुणे रेल्वेमार्गासाठी केंद्र सरकारने प्रस्तावास मान्यता दिली आहे. याकरिता 16039 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सेमी हायस्पीड, ब्रॉडगेज दुहेरी मार्गासाठी केंद्र व राज्य सरकार संयुक्त गुंतवणूक करणार आहेत. केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर राज्य सरकार या संदर्भात मान्यता दिल्यास रेल्वे मार्ग निर्मिती सुरू होऊ शकते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com