30 डिसेंबरला पद्वीधरची अंतिम मतदार यादी होणार प्रसिध्द

जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात निवडणुकीची अधिसुचना होणार प्रसिध्द
File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नाशिक पद्वीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांचा कार्यकाळ 7 फेबु्रवारी 2023 ला संपणार आहे. तर दुसरीकडे 30 डिसेंबरला या मदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर सात दिवसांत म्हणजे जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात नाशिक विभाग पद्वीधर निवडणुकीची अचारसंहिता प्रसिध्द होणार असल्याने जानेवारी आणि फेबु्रवारी महिन्यांत या मतदार संघातील नाशिक विभागातील नगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदूबार जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.

दरम्यान, नाशिक पद्वीधर मतदारसंघाच्या नव मतदार नोंदणीसाठी 1 ऑक्टोबरपासून नोंदणी कार्यक्रम सुरु झाला होता. नगर जिल्ह्यात आजअखेर 1 लाख 15 हजार 44 मतदार नोंदणी झाली असून 2017 मतदार नोंदणी कार्यक्रमात 85 हजार 286 मतदारांची नोंदणी झाली होती. त्या तुलनेत यंदा नव मतदार वाढले असून नाशिक विभागात नगर जिल्हा पहिल्यानंबर वर आहे. भारतीय निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार 1 नोव्हेंबर 2022 च्या अर्हत दिनांकावर आधारित नाशिक विभाग पदवीधर मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला होता.

त्यानूसार 23 नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीत दावे आणि हरकती स्वीकारल्या घेतल्या गेल्या. हरकतीची छाननी झाल्यानंतर 30 डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका दर सहा वर्षांनी होते. या निवडणुकांसाठी पात्र शिक्षक तसेच पदवीधरांनी प्रत्येक वेळी नव्याने नोंदणी करणे बंधनकारक आहे. पद्वीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी 1 नोव्हेंबर 2022 पुर्वी किमान 3 वर्षे आधी कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेले नागरिक मतदार नोंदणीसाठी पात्र आहेत.

पद्वीधर मतदारसंघासाठी अर्ज क्रमांक 18 भरून पद्वीधर नागरिक मतदार नोंदणी करू शकतात. त्याचप्रमाणे मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर यावर सुध्दा उपलब्ध करुन दिलेली आहे. अर्जासोबत पदवी प्रमाणपत्राची किंवा मार्कशिटची छायांकित प्रत जोडणे बंधनकारक आहे. नगर जिल्ह्यात या मतदार नोंदणी कार्यक्रमाची अंमलबजावणी मतदार नोंदणी अधिकारी तथा नाशिक विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या निर्देशात सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या संचालनात उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांचे संयोजनात निवडणूक शाखेमार्फत करण्यात आली.

या प्रक्रियेत सेवा उपविभागी अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे पद निर्देशित सहायक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून जबादार होती. जिल्हाधिकारी डॉ. भोसले, उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी यांचा निरंतर आढावा घेतला. नाशिक विभागात नगर जिल्ह्यात 1 लाख 15 हजार 44 तर नाशिक जिल्ह्यात 53 हजार 563, जळगाव 32 हजार 665, धुळ्यामध्ये 22 हजार 752, तर नंदुरबार जिल्ह्यात 18 हजार 7 56 मतदार नोंदणी झाली आहे. तर गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यात 85 हजार 565 मतदार नोंदणी झाली आहे. नाशिक जिल्ह्यात 96 हजार 136, जळगाव जिल्ह्यात 34 हजार 442, धुळे-25 हजार 422, तर नंदुरबार जिल्ह्यात 14 हजार 907 मतदार नोंदणी झाली होती.

जिल्ह्यातच सामना रंगण्याची शक्यता

नाशिक पद्वीधर मतदारसंघात सध्या काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे हे प्रतिनिधीत्व करत आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर अस्तित्वात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या सरकारकडून या निवडणुकीत तगडा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच झाल्यास जिल्ह्यातील विखे- थोरात यांच्यात या निवडणुकीत राजकीय संघर्ष होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता पक्ष देईल तो उमदेवार निवडून आणण्यात येईल, असे स्पष्ट केले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com