डॉ. राजेंद्र विखे ‘पदवीधर’साठी प्रबळ दावेदार

भाजपकडून उमेदवारीची चर्चा : प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवणार?
डॉ. राजेंद्र विखे ‘पदवीधर’साठी प्रबळ दावेदार

अहमदनगर (प्रतिनिधी)

नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू तथा प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती तथा प्रवरा मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र विखे पाटील भाजपच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सोशल मीडियावर फडणवीस व विखे बंधूंच्या भेटीचा फोटो व्हायरल झाला असून त्यावरून विविध राजकीय तर्क काढले जात आहेत. दरम्यान, डॉ.राजेंद्र विखे यांनी ‘सार्वमत’शी बोलताना उमेदवारीच्या शक्यतेचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे.

दोन दिवसांपूर्वी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व डॉ.राजेंद्र विखे पाटील यांच्यात भेट झाली. या भेटीचा फोटो शुक्रवारी व्हायरल झाला. सोबतच भाजपकडून डॉ.विखे यांना नाशिक पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी घोषित झाल्याची चर्चाही पसरली. या चर्चांनुसार, डॉ.विखे यांची उमेदवारी राज्यातील नेतृत्वाने जवळपास निश्‍चित केली असून केंद्रीय नेतृत्वाकडून दोन दिवसांत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. भाजपकडून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना राजकीय ताकद देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आल्याची चर्चा भाजपच्या अंतस्थ वर्तुळात आहे. त्यास जोडून डॉ.राजेंद्र विखे यांच्या उमेदवारीच्या शक्यतेकडे पाहिले जात आहे.

संभाव्य उमेदवारीच्या चाचपणीसाठी भाजपकडूनच पुढाकार घेण्यात आला, असे म्हटले जाते. यासाठी भाजप नेते तथा मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि डॉ.राजेंद्र विखे यांच्यातील मैत्रीचा संदर्भ दिला जात आहे. शैक्षणिक समारंभाच्या निमित्ताने पाटील आणि विखे यांच्यात भेटीगाठी वाढल्या. नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपचा उमेदवार विजयी करायचाच, यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. मैदानात डॉ.विखे यांच्यासारखा सक्षम उमेदवार असला तर ही जागा खेचून घेता येईल, अशी मंत्री पाटील यांची धारणा आहे. म्हणून त्यांनी विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पुढील हालचालींसाठी सूचीत केले. त्यानंतर चर्चा होऊन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उमेदवारीसाठी डॉ. विखे यांचे नाव पुढे केल्याचे म्हटले जाते.

अंतिम निर्णयासाठी केंद्रीय नेतृत्वाकडे प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय झाला असून यासाठी प्रदेशाध्यक्षांनी तातडीने दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घ्यावी असा सल्ला पक्षातील वरिष्ठांनी दिला आहे, असा राजकीय वर्तुळात पसरलेल्या चर्चेचा सार आहे. मात्र या चर्चांना कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. विखेंच्या निकटवर्तीयांनी देखिल असा कोणताही ‘अंतिम’ निर्णय झालेला नाही, अशी माहिती अनौपचारिक चर्चेत दिली. तर प्रदेश पातळीवरही अद्याप उमेदवारीची अधिकृत घोषणा झालेली नाही.

दोन दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत सदिच्छा भेट घेतली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. अवांतर विषयांवर संवाद झाला. त्यामुळे उमेदवारीच्या चर्चेत कोणतेही तथ्य नाही.

डॉ. राजेंद्र विखे पाटील, अध्यक्ष, प्रवरा मेडिकल ट्रस्ट

... तर विखे-थोरात सामना

ना. विखे यांचे विरोधक तथा काँग्रसचे नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे मेहूणे डॉ.सुधीर तांबे नाशिक पदरवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. ते पुन्हा उमेदवारी करत असून बैठकांचा सिलसिलाही सुरू झाला आहे. अशातच भाजपकडून डॉ.राजेंद्र विखे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने या निवडणुकीच्या निमित्ताने विखे-थोरात हा परंपरागत राजकीय सामना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com