20 वर्षांचा अंमलीपदार्थ साठा नष्ट

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसीत नगर पोलीसांची कार्यवाही
20 वर्षांचा अंमलीपदार्थ साठा नष्ट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर जिल्ह्यातील पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये गांजा, अफू साठे जप्त केले होते. जिल्ह्यात 20 वर्षांपासूनचा जप्त करण्यात आलेला 997 किलो 274 ग्रॅम अंमली पदार्थांचा साठा कायदेशीर प्रक्रिया करून नष्ट करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडी येथील एका कंपनीत ही कार्यवाही करण्यात आली.

जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यात 1994 ते 2014 या 20 वर्षाच्या कालावधीत 32 गुन्ह्यात एकूण 997 किलो 274 ग्रॅम गांजा व अफू हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. या गुन्ह्यांचा मुदतीत तपास पूर्ण करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायालयात नियमित सुनावणी होऊन न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. न्यायालयाने मुद्देमाल नष्ट करण्याचा आदेश दिले होते. पोलीस महासंचालक यांच्याकडील आदेशान्वये जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, पोलीस उपअधीक्षक (गृह) मेघश्याम डांगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विष्णू घोडेचोर, हवालदार भाऊसाहेब कुरुंद, सखाराम मोटे, शरद बुधवंत, देवेंद्र शेलार, पोलिस नाईक शंकर चौधरी, जयराम जंगले, अर्जुन बडे, बबन बेरड आदींच्या उपस्थितीत अंमली पदार्थ नष्ट करण्याची कायदेशिर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. रांजणगाव (पुणे) येथील एमआयडीसीमधील एका कंपनीत अंमलीपदार्थ नष्ट करण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com