
तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe
संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला शिवारातील एका विहिरीत अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने पंचक्रोशीत खळबळ उडाली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अण्णासाहेब कृष्णा चकोर यांच्या नान्नज दुमाला येथील शेतातील गटनंबर 722 मधील विहिरीमध्ये एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगताना आढळून आला. याबाबत संगमनेर तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय खंडिझोड, सहायक फौजदार रफिक पठाण, पोलीस हे. कॉ. अशोक पारधी, पोलीस नाईक अनिल जाधव, अनिल उगले, बाबासाहेब शिरसाठ यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक रहिवाशांच्या मदतीने क्रेनच्या सहाय्याने कुजलेल्या स्थितीतील मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. त्या व्यक्तीने अंगावर फुलबाही टी-शर्ट व दिव्या ग्लोड कंपनीची अंडरवेअर परिधान केलेली आहे. तर उजव्या हाताच्या कांबीवर बाबुलाल असे गोंदलेले होते.
मृत व्यक्तीचे वय अंदाजे 30 ते 35 वर्षे असावे, असे पोलिसांनी सांगितले. मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्याने चंदनापुरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शार्दुल देशमुख यांनी घटनास्थळीच शवविच्छेदन केले. ओळख मात्र पटू शकली नाही.
याप्रकरणी राहुल गंगाधर चत्तर यांनी पोलिसांना खबर दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार व पोलीस उपनिरीक्षक विजय खंडिझोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार रफिक पठाण अधिक तपास करीत आहेत. मृत व्यक्ती बाबत कुणाला काही माहिती असल्यास तालुका पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक विजय खंडिझोड यांनी केले आहे.