नान्नज दुमाला ग्रामपंचायतीचे सरपंच भिमराज चत्तर यांचे सरपंचपद रद्द

निवडणूक खर्च सादर न करणे भोवले
नान्नज दुमाला ग्रामपंचायतीचे सरपंच भिमराज चत्तर यांचे सरपंचपद रद्द

तळेगाव दिघे | वार्ताहर

संगमनेर (Sangamner) तालुक्यातील नान्नजदुमाला ग्रामपंचायतचे (Nanajdumala Grampanchayat) लोकनियुक्त सरपंच भिमराज नामदेव चत्तर (Bhimraj Namdev Chattar) यांनी मुदतीत निवडणूक खर्च सादर केला नाही, या कारणास्तव जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Collector Dr. Rajendra Bhosale) यांनी भिमराज चत्तर यांचे सरपंचपद रद्द केले असून त्यांना पुढील पाच वर्षांसाठी ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले आहे.

नान्नजदुमाला येथील माजी सरपंच बाबासाहेब नबाजी कडनर (Babasaheb Kadnar) यांनी जिल्हाधिकारी, अहमदनगर यांच्याकडे विवाद अर्ज दाखल केला होता. त्यात लोकनियुक्त सरपंच भिमराज नामदेव चत्तर व निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संगमनेर यांना प्रतिवादी करण्यात आले होते.

याप्रकरणाची जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्यासमोर सुनावणी झाली. बाबासाहेब कडनर यांचा विवाद अर्ज जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मंजूर केला. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १४ ( ब) मधील तरतुदीनुसार मुदतीत निवडणूक खर्च सादर न केल्याने पंचायत सदस्य राहण्यास अपात्र ठरवीत भिमराज चत्तर यांचे लोकनियुक्त सरपंच रद्द केले. त्याशिवाय पुढील पाच वर्षांसाठी ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले आहे.

लोकनियुक्त सरपंदपद रद्द झालेले भिमराज चत्तर भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष आहेत. तर विवाद अर्ज दाखल करणारे बाबासाहेब कडनर हे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे समर्थक काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com